विधानसभेत घमासान,

विधिमंडळ
 22 Dec 2021  409

* 12 आमदारांच्या निलंबनाचे भाजपने उट्टे काढले
* तत्कालीन तालिका सभापती भास्कर जाधव यांना माफी मागण्यास भाग पाडले
* -वक्तव्य काँग्रेसच्या नितीन राऊत यांचे अडवणूक मात्र सेनेच्या भास्कर जाधव यांची

लोकदूत वेबटीम 

 मुंबई 22 डिसेंबर 


गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपच्या १२ सदस्यांचे निलंबन केल्याने तत्कालीन तालिका अध्यक्ष व शिवसेना आमदार भास्कर जाधव (जि. रत्नागिरी) यांचे बुधवारी  भाजपने जोरदार उट्टे काढले.  ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या एका वक्तव्यप्रकरणी मध्ये पडलेल्या भास्कर जाधव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याप्रकरणी  सभागृहाची चक्क माफी मागावी लागली.

दुपारी लक्षवेधी सूचना चालु होत्या. त्यात एका प्रश्नाच्या उत्तरात काँग्रेस सदस्य व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी 'मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात ५० लाख देण्याची जाहीर केले होते' असे म्हटले. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाँइंट आॅफ आॅर्डरचा मुद्दा उचलला आणि हे वक्तव्या दाखवा नाहीतर माफी मागा, असे राऊत यांना आव्हान दिले.

या वादात ५ व्या रांगेत बसलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव मध्ये पडले. मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत असे आश्वास दिले हाेते, असा दावा त्यांनी केला. हे सांगताना जाधव यांनी नरेंद्र मोदी यांची  नक्कल केली. त्याला भाजप सदस्यांनी आक्षेप घेतला. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान यांचे अंगविक्षेप केले असून त्यांचा अपमान केला असल्याचा दावा केला.

यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील मध्ये पडले. त्यांनी सदर वक्तव्य तपासून अध्यक्षांनी निर्णय घ्यावी, अशी विनंती केली. मात्र निर्णय होईपर्यंत सभागृहाचे कामकाज पुढे जाऊ देणार नाही, अशी भाजपने भूमिका घेतली. 'आम्ही सुद्धा तुमच्या नेत्यांचा अपमान करु' असा इशारा फडणवीस यांनी दिला. आपण माफी मागणार नाही, असे जाधव यांनी स्पष्ट केले. शेवटी संसदीय कामकाज मंत्री अॅड. अनिल परब उठले आणि कोणत्याच पक्षाच्या नेत्यांचा अवमान होऊ नये, सत्ताधाऱ्यांची भूमिका असल्याचे सांगितले.

या गोंधळात दोनवेळा सभागृह तहकूब झाले. उपाध्यक्ष नरहरी झीरवळ हे यावेळी अध्यक्षपदी होते. शेवटी जाधव यांनी आपण अंगविक्षेप मागे घेऊ; मात्र माफी मागणार नाही, असे सांगितले. शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी केली आणि जाधव यांनी आपले शब्द मागे घेतले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरुळीत झाले.
---------------------------