बंडखोर शिंदे गटाला धक्का ;16 आमदारांना अपात्रतेच्या कारवाईच्या नोटीसा देणार

विधिमंडळ
 25 Jun 2022  633

ठरलं, शिवसेनेच्या १६ बंडखोरांना नोटीसा

-उपाध्यक्ष नरहरी झीरवळ यांचा निर्णय
-सहा तास चाललेल्या बैठकीनंतर निर्णय


लोकदूत वेबटीम 

मुंबई 24 जून 


शिवसेनेतून बंड करीत भाजपच्या मार्गावर असलेले एकनाथ शिंदे  यांच्या गटाला जोरदार धक्का देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड पुकारत  गुहावटीला गेलेल्या शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्रतेच्या कारवाईची नोटीस बजावण्याबाबत प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांना मोठा धक्का मानला जात आहे. 

यासंदर्भात शुक्रवारी दुपारी विधिमंडळात सुरु झालेली बैठक तब्बल सहा तास चालली. १६ सदस्यांच्या अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय बंडखोर शिंदे गटाला मोठा धक्का मानला जातो.

शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी बुधवारी  सेनेच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीला बंडखोर सदस्य अनुपस्थित राहिले. त्याप्रकरणी पक्षशिस्त मोडल्याबद्दल त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी याचिका सेनेचे नवे गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे केली होती.

त्याप्रकरणी आज विधिमंडळात सेनेचे सुभाष देसाई, अनिल देसाई, अंबादास दानवे, अजय चौधरी, अरविंद सावंत आदी नेते ठाण मांडून होते. विधानसभा उपाध्यक्ष यांचा निर्णय होत नव्हता. शेवटी रात्री ९ वाजता राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली. त्यानंतर रात्री उशीरा बंडखोर १६ सदस्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया करण्याचे ठरले.

आता या १६ बंडखोरांना आपले म्हणणे विधानसभा उपाध्यक्ष यांच्यासमोर मांडावे लागणार आहे. बंडखोर सध्या गुहावटीत आहेत. या १६ आमदारांना त्यांचे म्हणणे ४८ तासामध्ये मांडण्याची सूचना केली आहे. त्यानंतर योग्य ती उपाध्यक्ष कारवाई करतील, असे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत म्हणाले.
--------