राज्यात दर दिवशी कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत.

विधिमंडळ
 04 Mar 2020  661

राज्यात दर दिवशी कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत.

तीन वर्षाच्या चिमुरडीपासून ५५ वर्षाच्या महिलेवर अत्याचार होतोय....

 

*विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची टीकेची झोड

 

लोकदूत  वेबटीम 

मुंबई 4 मार्च  

 

राज्यात गेल्या दोन महिन्यात महिलांविरुध्द घडणा-या अत्याचाराच्या घटना महाराष्ट्राला लांच्छनांस्पद आहेत. पेट्रोल ओतून महिलेला जाळण्यात येत आहे, तिचा खून करण्यात येत आहे, लागोपाठ बलात्काराच्या, खूनाच्या घटना घडत आहेत, कुठे दरोडे पडत आहेत, तर कुठे लूटमारीचे प्रकार होत आहे, तीन वर्षाच्या चिमुरडीपासून ते ५५ वर्षाच्या महिलेवर अत्याचार होत आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे दरदिवशी धिंडवडे निघत आहे. राज्यातील जनतेच्या मनात भीती निर्माण झाली आहे, राज्य सरकरारचे कायदा व सुव्यवस्थेकेड पूर्ण दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आता याचे उत्तर द्या अन्यथा एक दिवस जनतेमध्ये उद्रेक होईल व सरकारला पळता भुई थोडी होईल, असा संतप्त इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.

विधानपरिषदेत नियम २६० अनव्येच्या प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते दरेकर यांनी, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या विषयावर सरकारविरुध्द टिकेची झोड उठविली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून हिंगणघाट येथील जळीतकांड असो की जालना, सिल्लोड, औरंगाबाद, सोलापूर, पनवेल, मिरारोड आदी ठिकाणी मन सुन्न करणा-या घटना घडत आहेत. महिला अत्याचाराबाबत क्रौर्याची परिसिमा गाठली जात आहे. नगरमधील पाथर्डी तालुक्यात एका महिलेवर झालेल्या अत्याचारामुळे तीने दाखल केलेली फिर्याद मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला, या प्रकरणी त्या महिलेने एमआयडीसी व कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल केला. पण काहीही उपयोग झाला नाही. हा गुन्हा दाखल करतेवेळी त्या फिर्यादी महिलेला कधी पोत्यामध्ये डांबून तर कधी हातपाय बांधून जीवंत मारण्याच्या उद्देशाने प्रचंड मारहाण करण्यात आली असा उल्लेख आहे. एवढेच नव्हेतर ही फिर्यादी महिला आपल्या पतीसह सिव्हिल हॉस्पीटल येथून रिक्षाने निघाली असता, रिक्षात एक अनोळखी इसम रिक्षात घुसला व त्या इसमाने पिडीत महिला व तिच्या पतीला बेशुध्द केले व त्यांना अज्ञात स्थळी नेले, त्याठिकाणी आठ आरोपी व स्वत:ला पोलीस म्हणवून घेणारे दोन अनोळखी इसमाने पिडीत महिला ती महिला व तिच्या पतीला लाथाबुक्याने मारहाण केली, एवढेच नव्हे तर दोघांना विवस्त्र करुन अंगावर पेट्रोल टाकून पट्टयाने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे, हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांच्यावर अनेक दबाव टाकण्यात आले, पण एका पत्रकाराने हे प्रकरण उघडकीस आणले आणि त्या महिलेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. त्यामुळेच ह्दय पिळवटून टाकणारी घटना जनतेसमोर आली. परंतु दुर्देवाने आजही या प्रकरणामध्ये काहीही कार्यवाही झालेली नाही. असा गंभीर आरोप दरेकर यांनी केला.

महाराष्ट्रात दिशा हा कायदा आणण्याबाबत केवळ चर्चा सुरु आहे. परंतु दरदिवशी बलात्कार, विनयभंग व खुनाच्या घटना घडतच आहेत. त्याला जबाबदार कोण, असा सवाल करताना प्रविण दरेकर म्हणाले की, आपण एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळयासमोर ठेवून राज्य करतो, मग या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महिला असुरक्षित का आहेत. महिलांच्या अत्याचारावरील क्रौर्यामध्ये वाढ होत आहेत. कायदा व सुवव्यवस्थेचे अस्थित्व नाहीसे झाले आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात गुन्हेगारी करणा-या नराधमांची नामे बदलली आहे, पण त्यांच्यामधील विकृती आजही कायम आहे. हे महाराष्ट्र राज्य आता गुन्हेगारीची राज्य म्हणून ओळखले जावू लागले आहेत, अशी टिकाही दरेकर यांनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या राज्यात महिलेच्या सुरक्षिततेला कुठलाही धोका निर्माण होणार नाही, असे वचन देणा-या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या राज्यात दरदिवशी जळीतकांड, अत्याचार, विनयभंग, ॲसिडहल्ले, बलात्कार अशा घटना घडतच आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी आत राज्यातील जनतेला उत्तर दयावे व जनतेच्या मनातील भिती दूर करावी, असे आवाहन श्री दरकर यांनी यावेळी केले. 

जनतेचे संरक्षण करणा-या पोलीसांच्या घरांकडेही या सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप करताना दरेकर म्हणाले की, शांतीसागर पोलीस गृहनिर्माण संस्थेचा १७०९६.८८ चौ.मी.चा टीडीआर बेकायदेशीररीत्या चौहान हौसिंग इंडिया लि. यांना मिळवून देण्याकरीता अनिमितता करण्यात आली आहे. सरकारची ही कृती बेकायदेशीर आहे. त्यामुळे या प्रकल्पात सुमारे ४०० पोलीस सभासदांबरोबर म्हाडा झोपडपट्टी धारक अशा ८७५ सदस्यांना अद्यापही घरे मिळालेली नाही. जर हा टीडीआर विकला गेला तर पोलीसांच्या या गृहनिर्माण संस्थेत घर मिळणार नाही, अशी टीका ही दरेकर यांनी केली.आहे.