अर्थसंकल्पावरून दरेकरांनी सुनावले खडेबोल

विधिमंडळ
 15 Mar 2022  440


*विकासाची पंचसुत्र केवळ कागदावरच प्रत्यक्षात

भ्रष्टाचाराची पंचमहाद्वारे उघडणे हेच सरकारचे लक्ष्य


*विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची टिका

लोकदूत वेबटीम 

मुंबई १४ मार्च

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून यापूर्वीही अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना भ्रष्टाचाराची पंचमहाद्वारे कशी उघडतील याच पध्दतीने राज्यकारभार करण्यात आला. सत्तेचा वापर हा केवळ स्वतच्या संस्थासाठी, बिल्डरसाठी, वाईन उद्योगासाठी करण्यात आल्याचा घणाघाती आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना केला आहे.

अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना दरेकर यांनी आपल्या सुमारे सव्वातासाच्या घणाघाती भाषणात महाविकास आघाडी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील जोरदार टिका केली.  महाविकास आघाडी सरकारने सहकारी साखर कारखान्यांसाठी हजारो कोटी रुपयांची थकहमी ठेवली. विहंग रियालीटीसाठी शेकडो कोटींचा दंड माफ केला. अशाप्रकारे महाविकास आघाडी सरकारने सत्तेचा वापर स्वतःच्या संस्थांसाठी केला आहे. या सरकारने विकासकांना प्रिमियम मध्ये माफ केले. मुद्रांक शुल्कामध्ये सवलत दिली अशा पध्दतीने मदत करुन अप्रत्यक्षरीत्या शासनाचा खिसा खाली करुन स्वत:चा खिसा भरण्याचा व सत्तेचा वापर बिल्डरांसाठी करण्याचं काम या सरकारने केले आहे. या सरकारचा स्वतःच्या उद्योगांना शासनाच्या धोरणाचा लाभ कसा होईल असे निर्णय घेण्याकडे कल आहे. सरकारने सत्तेचा वापर वाईन उद्योगासाठी केला. सत्तेचा वापर काळया यादीतील कंत्राटदांरांची देयके काढण्यासाठी व जलसंपदा विभागातील वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली निसार खत्री सारख्या भ्रष्टचारी कंत्राटदाराची देयके काढण्यासाठी केला. शासनाने अभय योजना सुरू केली. ही योजना म्हणजे वाटाघाटीद्वारे स्वतःचे खिशे गरम करण्याचा प्रयत्न आहे. या योजनेअंतर्गत विलंब शुल्क, विलंबीत कर, एक रकमी तडजोडीने भरण्याची घोषणा शासनाने केली, ही घोषणा म्हणजे शासनाचे कमी व स्वत:चे खिशे जास्त भरण्याची योजना आहे, असा टोला दरेकर यांनी लगावला.

*कोकणासाठी ५ हजार कोटींचे पॅकेज द्या*

कोकणामध्ये असणारे समुद्र किनारे लाखो पर्यटकांना दरवर्षी आर्कषित करु शकतात, परंतू पायाभूत सुविधांच्या अभावामुळे इच्छा असूनही पर्यटक तिथे जात नाहीत.विशेषत: पर्यटनासाठी दिलेला निधी राज्य सरकारला महसुलाच्या स्वरुपात परत मिळू शकतो, कारण पर्यटक एकदा आले की, हॉटेल उद्योग, रेस्टोरंट उद्योग, किरकोळ विक्रेते, वाहतुक उद्योग, मनोरंजन उद्योग इत्यादी उद्योगांना उभारी मिळते. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन कोकणामध्ये अनेक प्रवेशव्दार करण्याची आवश्यकता आहे. महाबळेश्वर ते दापोली व्हाया पोलादपूर हा रस्ता केल्यास महाबळेश्वरचे पर्यटक कोकणातील (अंजर्ने समुद्र किनारा, हर्णे समुद्र किनारा) येथे येतील व कोकणातील पर्यटक महाबळेश्वर मध्ये जातील. अशाप्रकारे, कोकणमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी ५ हजार कोटींचे पॅकेज देण्यात यावे अशी मागणी दरेकर यांनी केली.

 

राज्यातील मच्छिमार बांधव आज आंदोलन करतोय. त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे त्यामुळे मत्स्य व्यवसायाकरीता अतिरिक्त निधी देण्याची आवश्यकता आहे. मत्स्य उत्पादनामुळे महत्वाचे परकीय चलन पण मिळू शकेल. तसेच रोजगार निर्मिती पण होईल. म्हणून, मत्स्य व्यवसायिकांसाठी / पर्यटन उद्योगासाठी / आंबा, काजू प्रक्रिया उद्योगासाठी व पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी किमान ५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात यावे अशी मागणी चर्चेच्या माध्यमातून दरेकर यांनी केली.

*किमान समान कार्यक्रमाचा सरकारला विसर*
महाविकास आघाडी सरकार हे फक्त बोलणाऱ्यांचे सरकार आहे. या सरकारने किमान समान कार्यक्रमात ज्या घोषणा केल्या त्याचा पूर्णतः विसर या सरकारला पडला आहे. या सरकारने सरकार येण्याआधी  गरीब व गरजूंसाठी १ रुपयात क्लिनिक सुरू करू असे सांगितले. मात्र अर्थसंकल्पात याचा चा यावर्षीही उल्लेख नाही. झोपडपट्टीवासियांसाठी ३०० एवजी ५०० चौ.फुटाचे घर अशी घोषणा केली. मात्र याचाही उल्लेख नाही. प्रत्येक नागरीकाला आरोग्य विभागाचे कवच, आशा आंगणवाडी सेविकांचे मानधनात वाढ,आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी0 % दराने शैक्षणिक कर्ज अशा अनेक घोषणा फक्त कागदावर राहिल्याची टीका दरेकर यांनी केली.

*हिंदू मंदिरांकडे व तिर्थक्षेत्रांकडे दूर्लक्ष*
राज्यात हिंदू मंदिरांकडे व तिर्थक्षेत्रांकडे दूर्लक्ष झालं आहे. स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आज असते तर हिंदू मंदिरांकडे व तिर्थक्षेत्रांकडे असे दूर्लक्ष झाले असते का ? असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे. दरेकर म्हणाले, स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज असते तर शिवसेनेला हिंदूत्वाची कास सोडू दिली नसती. आज मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली आहे काय? अशी शंका व्यक्त करण्याइतपत सरकारचा कारभार सुरु आहे.त्याच अभिभाषणात व अर्थसंकल्पात प्राचीन मंदिरांचे संवर्धन करण्यात येईल असा उल्लेख करण्यात आला होता.या घोषणेवरुन शिवसेनेने महाविकास आघाडीत राहून हिंदूत्वाचा अजेंडा राबवित असल्याचे वाटत होते.परंतु आज दोन वर्षांनंतर या घोषणेच्या अंमलबजावणीची परिस्थिती काय आहे हा चिंतनाचा विषय आहे.