ममतादीदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबई
 01 Dec 2021  211

'युपीए' अस्तित्वात नाही, काँग्रेस लढायला तयार नाही

ममता बॅनर्जी यांचा काँग्रेसला घरचा आहेर
ममता बॅनर्जी यांनी घेतली शरद पवार यांची भेट
भाजपला प्रादेशिक पक्षांचा पर्याय उभा करण्यावर झाली चर्चा

लोकदूत वेबटीम 

 मुंबई 1 डिसेंबर 


केंद्रातील मोदी सरकारविरोधात आघाडी उघडणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (ता.१) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. बैठकीनंतर दोघांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ममता यांची काँग्रेवरची नाराजी पुन्हा अधोरेखित झाली. एका प्रश्नाला उत्तर देताना आता यूपीएवगैरे अस्तित्वात नसल्याचे त्या म्हणाल्या. यामुळे भाजपविरोधी नव्या आघाडीत काँग्रेसचे स्थान काय, याची चर्चा सुरू झाली आहे.

ममता म्हणाल्या की, मी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. पण ते आजारी असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. आज ज्या प्रकारे देशात फॅसिझम सुरु आहे, त्याविरोधात सक्षम पर्याय निर्माण झाला पाहिजे ; पण हे एकट्याचे काम नाही. भाजपविरोधात लढणारा सक्षम पर्याय असायला हवा, पण काँग्रेस लढायला तयार नाही, असे देखील त्या म्हणाल्या. भाजप विरोधात पर्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तसेच तिसरी आघाडी शक्य असल्याचे सुतोवाच ममता यांनी केले.

पत्रकारांनी  पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने यूपीएचे नेतृत्व करायला हवे का?, असा प्रश्न विचारला. ममता यांना हा सवाल  रुचला नाही. या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, देशात आता यूपीए शिल्लक राहिलेलेली नाही.

पवार म्हणाले, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचे नाते जुने आहे. ते आणखी सकस होण्यासाठी ममता मुंबईत आल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावर जी परिस्थिती आहे ती पाहता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. देशात एक नवा मजबूत पर्याय उभा करणे अत्यंत आवश्यक आहे.२०२४ च्या निवडणुकांमध्ये हा पर्याय उपलब्ध व्हायला हवा. यासाठीच आमची भेट होती, असे पवार म्हणाले.

“काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाशिवाय हा पर्याय उभा करण्याचा प्रश्नच नाही. भाजपाविरोधी असलेल्या कुणालाही एकत्र यायचे असेल, तर त्यांचे स्वागत आहे. नेतृत्व हा आमच्यासाठी मुद्दा नाही, सक्षम पर्याय देणे महत्त्वाचे आहे. कुणाला वगळण्याचा प्रश्न नाही. ज्याची मेहनत करायची तयारी आहे. त्यांना सोबत घेऊन चालायचे आहे”, असे शरद पवारांनी यावेळी नमूद केले.

नव्या आघाडीत काँग्रेसला स्थान असेल का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर पवार म्हणाले की, काँग्रेस नसेल असे मी बोलत नाही. केंद्रात निर्माण झालेल्या परिस्थितीविरोधात जे कोणी लढायला तयार आहेत, अशा सर्वांना एकत्र घेतले जाईल, असेही पवार म्हणाले.

ममता यांनी दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यात राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या नेत्यांची भेट घेतली, मात्र या दौऱ्यात काँग्रेसला दूर ठेवल्याने भाजवविरोधी पर्यायात काँग्रेसचे स्थान काय, असा प्रश्न उभा राहिला आहे.