राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक,कारवाई ची मागणी

मुंबई
 09 Jun 2023  167

शरद पवार यांना धमकी
राष्ट्रवादी आक्रमक
अजित पवार, सुप्रिया सुळे यांची कारवाईची मागणी

लोकदूत वेबटीम

मुंबई 9 जून


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने शुक्रवारी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या धमकी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून  खासदार सुप्रिया सुळे यांनी धमकी प्रकरणी  मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन  तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. या मागणीनंतर   राज्य सरकारने पवार यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून ओळखल्या  जाणाऱ्या  शरद पवार यांनी अलीकडच्या काळात भाजपच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीचे ऐक्य अबाधित ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे . या पार्श्वभूमीवर  'तुमचा दाभोळकर होणार,' अशी धमकी ट्वीटद्वारे त्यांना देण्यात आली  आहे.  धमकीची   गंभीर बाब लक्षात घेऊन  सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी सोशल मिडियावर आलेल्या त्या धमकीच्या स्क्रीन शॉटची झेरॉक्स  देण्यात आली.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पवार यांना आलेल्या धमकीचे   गंभीर प्रकरण असल्याचे सांगत  केंद्र आणि राज्य सरकारने या धमकीची गांभीर्याने दखल घेऊन आरोपींना तातडीने गजाआड करावे, अशी मागणी केली. सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर अकाउंटवरून ही धमकी आली आहे. या पिंपळकर मागचा  खरा सूत्रधार  शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावे , हेच राज्याच्या हिताचे असेल, असे अजित पवार म्हणाले.

 शरद पवारांचे संरक्षण करण्यास महाराष्ट्रातील जनता समर्थ आहे. परंतु डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रीय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्याने यापुढे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करुन समाजात द्वेष निर्माण करण्याचे, दुही माजवण्याचे, मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील आणि  ते हाणून पाडले जातील. देशातील जनता आता सावध  आहे. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या भूलथापांना भुलणार नाही. कुणाच्याही कटकारस्थानांना बळी पडणार नाही, असा विश्वास  अजित पवार यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास : शरद  पवार
 
दरम्यान, महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था सांभळणाऱ्या पोलीस दलाच्या कर्तुत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे त्याची चिंता मी करत नाही. ज्यांच्या हातात राज्याची सूत्रे  आहेत त्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. राज्याच्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक प्रश्नावर मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुणी धमक्या देऊन कुणाचा आवाज बंद करू शकेल असे वाटत असेल, तर तो त्यांचा गैरसमज आहे, असेही पवार म्हणाले.


धमकीची गंभीर दखल  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची राज्य  सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, त्यांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत. शरद पवार ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून दिली.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातले वातावरण बिघडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यापासून काही लोक बिथरले आहेत, त्यातून महाराष्ट्रातले वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगजेब, टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करुन धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आपल्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली कायदा आणि  सुव्यवस्था बिघडविण्याचे कारस्थान हाणून पाडले जाईल, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

राजकीय नेत्यांना दिलेल्या धमक्या खपवून घेणार नाही : देवेंद्र फडणवीस

 कोणत्याही राजकीय नेत्यांना दिलेल्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च परंपरा आहे. राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमक्या देणे किंवा समाज माध्यमांवर व्यक्त होताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणे हे खपवून घेणार नाही. अशा प्रकरणात कायद्याप्रमाणे पोलीस निश्चितपणे कारवाई करतील, असा  विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. शरद पवार यांना ज्या ट्विटर हॅण्डलवरुन धमकी आली, त्याची शहानिशा करुन कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचे फडणवीस म्हणाले.  
...................