भाजपला सहआरोपी करा - नाना पटोले

मुंबई
 12 Apr 2022  297

विक्रांत प्रकरणी  भाजपला सहआरोपी करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी 

लोकदूत वेबटीम 

 मुंबई 12 एप्रिल 
 
‘विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली भाजप आणि  किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या पैशांचा हिशोब जनतेला दिला पाहिजे.  सोमय्या यांनी जमा केलेला निधी पक्षाला दिल्याचे  सांगितल्याने या प्रकरणी भाजपला सहआरोपी करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी मंगळवारी केली.   सोमय्यांनी हा निधी भाजपला  दिला असेल तर  पक्षाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि  खजिनदाराची चौकशी करावी, अशी मागणीही  त्यांनी केली आहे. 

विक्रांतच्या प्रकरणात सोमय्या यांच्यावर ५७ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळला आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले यांनी भाजपवर टीका केली.    

सोमय्या यांनी   सर्वसामान्य लोकांकडून ‘सेव्ह विक्रांत’च्या नावाखाली रोख पैसे जमा केले.  या पैशांची कोणतीही पावती लोकांना दिलेली नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेतल्याचेही स्पष्ट झाले नाही. जनतेकडून जमा केलेली रक्कम राजभवन, राष्ट्रपतीभवन अथवा संरक्षण मंत्रालय यापैकी कोणाकडेही जमा न करता जनतेचा हा पैसा त्यांनी  भाजपकडे जमा  केल्याचे सोमय्या यांच्या वकिलांनी  उच्च न्यायालयात सांगितल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात आलेल्या आहेत, असे पटोले  म्हणाले. 

 जर भाजपने  हा पैसा घेतला असेल तर तोही गुन्हाच आहे.  त्यामुळे भाजप आणि  त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर कारवाई झाली पाहिजे. तो रोख पैसा भाजपने कसा घेतला आणि  त्याचा कशासाठी वापर केला हे जनतेला जाणून घ्यायचा अधिकार आहे. त्यामुळे ‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली केलेल्या वसुली प्रकरणी सोमय्या यांच्याबरोबर भाजपचीही चौकशी करुन कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पटोले  यांनी केली.