दरेकरांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

मुंबई
 12 Apr 2022  267

मुख्यमंत्र्यांनी  माझ्याविरोधात कट रचला 
प्रवीण दरेकर यांचा आरोप 
अटकपूर्व जमीन अर्जावर  प्रतिक्रिया 

लोकदूत वेबटीम 
मुंबई 17 एप्रिल 


 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालय आणि पोलीस आयुक्त हे काही लोकांना हाताशी धरून माझ्याविरुद्ध कट रचत होते. या सगळ्यांचे सीडीआर तपासले तर नेमके कसे कारस्थान रचले हे लक्षात येईल, असा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी मंगळवारी येथे  केला.

मुंबै बँक निवडणुकीतील बोगस मजूर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने आज दरेकर यांना  अटकपूर्व जामीन मंजूर केला.  न्यायालयाच्या निकालानंतर प्रसार माध्यमांशी  बोलताना दरेकर म्हणाले,  आज मुंबई उच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आहे. कारवाई करून सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हे जेवढा अन्याय करतील तेवढ्या जास्त ताकदीने मी या सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखालीच हे सर्व षड्यंत्र होते. गुन्हा दाखल करून मला  अडकवण्याचा सरकारचा  डाव होता. विरोधी पक्षनेता म्हणून या सरकारचा  भ्रष्टाचार, घोटाळे बाहेर काढण्याचे  काम मी करत होतो.  त्याचा सूड उगवण्याचे काम अशा प्रकारच्या कारवाईतून सरकारला करायचे होते. सरकारचे मंत्री तुरुंगात आहेत.  मग भाजपचे जे नेते आरोप करत आहेत त्याला  आपणही उत्तर दिले पाहिजे, अशा प्रकारची महाविकास आघाडीची रणनीती  ठरली असल्याचा दावा दरेकर यांनी केला. 
 
संजय राऊत यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दबाव आणला आणि नाईलाजाने गृहमंत्री तसेच  गृहखाते कार्यान्वित झाले.  किरीट सोमय्या यांच्याविरोधात आणि  माझ्याविरोधात  गुन्हे  दाखल करून चौकशीचा ससेमिरा मागे लावला, असा आरोपही  दरेकर यांनी केला.