प्रवीण दरेकरांची पोलीसांकडून चौकशी

मुंबई
 04 Apr 2022  273

बोगस मजूर प्रकरणी विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकरांची चौकशी

-पोलीस स्टेशनच्या बाहेर भाजपा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
-प्रविण दरेकर यांचे मुंबई पोलीस आयुक्त यांच्यावर आरोप
-अटक टळली तरी दरेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 4 एप्रिल 


मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेच्या निवडणुकीत बोगस मजूर दाखवून फसवणुक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात विधानपरिषद विरोधी पक्षनेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांची सोमवारी  मुंबई पोलीसांनी चौकशी केली. दरेकरांची चौकशी चालु असताना पोलीस स्टेशबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. चौकशीनंतर दरेकर यांनी पोलीसांवर आरोप केले.

दरेकर बोगस सदस्य असलेल्या प्रतिज्ञा मजूर संस्थेच्या गेल्या पाच वर्षांतील कामकाजाची चौकशी करण्याचे आदेशही सहकार विभागाने जारी केले आहेत. या प्रकरणी सुनावणीला दरेकर हजर न राहता आपल्या प्रतिनिधी मार्फत युक्तिवाद केला होता. मात्र हा युक्तिवाद समाधानकारक नसल्यामुळे मुंबई सह निबंधकांनी दरेकर यांचे मुंबै बँकेचे संचालक पद अपात्र ठरविले होते.

१९९७ पासून मजूर असल्याचे दाखवत प्रविण दरेकर यांनी शासनाची फसवणूक केली आहे, असा आरोप करत त्यांच्याविरुद्ध  आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई मार्ग आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या चाैकशीसाठी पोलीसांनी दरेकर यांना शनिवारी (ता.२) नोटीस बजावली होती.

दरेकर यांची आज साडेतीन तास चौकशी झाली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनबाहेर माेठी गर्दी केली होती. दरेकर यांच्या पाठिंब्याच्या घोषणा कार्यकर्ते देत होते. कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.  

एकुण, मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादीने भाजपसंबंधातील आपली कार्यपद्धती बदलली असून यापुढे त्याचे दृश्य परिणाम दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-----------