मंत्री आव्हाड यांचे राज ठाकरेंना आवाहन

मुंबई
 04 Apr 2022  268

महाराष्ट्र पेटेल असे  वक्तव्य करू नका!
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे आवाहन

लोकदूत वेबटीम 
मुंबई 4 एप्रिल 


महाराष्ट्र शांत आहे. राज्यात कुठेही क्लेश नाही,  द्वेष दिसत नाही. सर्व समाज एकत्र वावरताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र पेटेल असे  काही वक्तव्य करू नका,  अशी विनंती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नाव न घेता केली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना मशिदींवरील भोंगे उतरविण्याची आणि मदरशांवर धाडी घालण्याची मागणी केली होती. यांच्या या विधानावर आव्हाड यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.


कोरोनाच्या संक्रमणाची दोन वर्षे संपल्यानंतर लोक कामाला लागले आहेत.  त्यांच्या खिशात पैसे नाहीत. गॅस,  पेट्रोल,  डिझेल, भाज्या, केरोसिन इतकेच काय  खाण्यापिण्याच्या वस्तूपासून सर्वच महाग झाले आहे. त्यामुळे काही लोकांकडून  जे गरजेचे  नाही ते मुद्दे नवले जात असून जनतेला मुख्य विषयापासून दुसरीकडे नेण्याचे काम सुरू आहे, असा  आरोप आव्हाड यांनी केला.
विरोधकानी गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ, महागाई याबद्दल बोलावे. ही महागाई गरीबांना किती खात आहे याबद्दल बोलावे. "राम " जरूर म्हणा, परंतु लोकांना 'राम नाम सत्य है' बोलायला लावू नका, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.