सेवा समाप्तीचा एसटी कामगारांना इशारा

मुंबई
 18 Nov 2021  216

एसटीच्या २२९६ कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीच्या नोटीसा
-एसटी महामंडळाने उचलले मोठे पाऊल
-कर्मचारी व नेते यांचे राज्यपाल यांच्याकडे गाऱ्हाणे

लोकदूत वेबटीम 

मुंबई 17 नोव्हेंबर 


एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी एसटी महामंडळ सरसावले आहे.  रोजंदारीवर काम करणाऱ्या 2 हजार 296 कामगारांना बुधवारी सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. या कामगारांनी 24 तासांत कामावर हजर व्हावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल असे नोटीशीत म्हटले आहे.

एसटी महामंडळाने आतापर्यंत 2 हजार 178 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान बुधवाली एसटी महामंडळाचे ७ हजार ४०० कर्मचारी कामावर हजर हाेते. त्यात २६४ चालक आणि १३९ वाहकांचा समावेश होता. तर १०७ बसेस राज्याच्या विविध भागात सोडण्यात आल्या . त्यातून २ हजार ८९९ प्रवाशांनी प्रवास केला. सध्या एसटीची हजेरी पटावरील एकूण कामगारांची संख्या 92 हजार 266 आहे. प्रत्यक्षात संपामध्ये भाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 84 हजार 866 आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरू आहे. आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पाठिंबा दर्शवला. आठवले पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर आले होते. ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी लढा आणखी तीव्र करा, अशी सूचना त्यांनी केली.

सरकार संप फोडण्यासाठी सारे प्रयत्न करत आहे, मात्र अजूनही ८४ हजार ८६६ कर्मचारी संपावर असल्याने एसटीची सेवा अद्याप सुरळीत होऊ शकली नाही.
------------