आर्यन खान प्रकरण;25 कोटीची मांडवली

मुंबई
 24 Oct 2021  191


-8 कोटी रुपये एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यासाठी होते

-ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार साईलने कथन केली कहाणी

-१५ दिवस सोलापुरात जीवाच्या भीतीने लपून राहिला पंच

-एनसीबीने साक्षीदार साईलचे सर्व आरोप फेटाळले

लोकदूत वेबटीम 

 मुंबई 24 ऑक्टोबर 

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन अंमली पदार्थ प्रकरणी रविवारी (ता.२४) धक्कादायक चित्रफीत समोर आली.  या प्रकरणातील साक्षीदार के. पी. गोसावी याचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईल याची ही चित्रफीत आहे. आर्यन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता, त्यासाठी २५ कोटींची मांडवली झाली. त्यातील ८ कोटी रुपये अंमली पदार्थ विरोधी विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचा दावा साईल याने या कथित चित्रफीतीत केला आहे.


प्रभाकर साईल (ठाणे) याने  तो के. पी. गोसावीचा (नवी मुंबई) सुरक्षा रक्षक असल्याचा दावा केला. या चित्रफीत प्रभाकर साईल म्हणत आहे, “आम्ही लोअर परळच्या दिशेने गेलो. तिथे पुलाखाली आमची गाडी उभी राहिली. पाठीमागून इनोव्हा मोटार आली. अचानक त्या गाडीमागे निळ्या रंगाची मर्सिडिज आली. मी जाऊन बघितले तर त्या गाडीत शाहरुख खानची मॅनेजर बसली होती. यानंतर के. पी. गोसावी, सॅम आणि पूजा दादलानी या तिघांमध्ये बैठक झाली.”

“या बैठकीत त्यावेळी काय झाले हे मला समजले नाही. गाडीमधून पुन्हा त्यांनी फोन केला की २५ सांग, शेवटी १८ अंतीम कर, कारण त्यातील ८ समीर वानखेडे साहेबांना जाणार आहेत. बाकी १० आपल्यात वाटून घ्यायचे आहेत. मी एवढे त्यांचे फोनवरचे संभाषण ऐकले,” अशी माहिती प्रभाकर साईल याने दिली.


तसेच आपल्या जीवाला समीर वानखेडे यांच्याकडून धोका असल्याने आपण सोलापुरात मित्राकडे लपून राहिलो. मात्र रिपब्लीकन सेनेच्या सोलापुरच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीने आपण मुंबईतील मनोज संसारे यांच्याशी संपर्क साधला आणि पुढे येण्याचे धाडस केले, असा दावा साईल याने केला आहे.


समोर आलेल्या या चित्रफीतीबाबत चर्चांना उधाण आले आहे. या कथित चित्रफीती खातरजमा होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळेच याची चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांकडुन सध्या केली जात आहे. प्रभाकर साईलने दूरचित्रवाहिन्यांना आज दिलेल्या मुलाखतीत के. पी. गोसावीची चित्रफीत आपणच काढल्याचा दावा केला आहे.

-------------------

एनसीबीने आरोप फेटाळले:

एनसीबीने सायंकाळी प्रसिद्धी पत्रक जारी केले. त्यात म्हटले आहे, प्रभाकर साईल यांचा दावा ऐकीव माहितीवर आधारित आहे, त्याने आपले मत हे न्यायालयात मांडावे. आमचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांनी त्यांच्यावर केलेल्या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. यातील माहिती तपासाबाबत अत्यंत महत्वाची आहे आणि न्यायप्रलंबित आहे. साईल यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र एनसीबीच्या महासंचालकांना पाठवत आहोत. साईल यांच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती आम्ही करत आहोत.