आर्यन खान प्रकरणातील "डील" ची चौकशी करा

मुंबई
 24 Oct 2021  197


-राज्य सरकारने एसआयटी स्थापन करुन चौकशी करावी

-संजय राऊत व नवाब मलिक यांनी केली मागणी

लोकदूत वेबटीम 

 मुंबई 24 ऑक्टोबर 

अंमली पदार्थ विरोधी विभागाने (एनसीबी) अरबी समुद्रातील क्रुझवर टाकलेल्या छाप्यात मांडवली झाल्याचा आरोप साक्षीदार पंचाने केल्याने प्रकरणाने नवे वळन घेतले आहे. त्यामुळे या प्रकरणाची राज्य सरकारने विशेष चौकशी पथक (एसआयटी) नेमावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षातील नेते व मंत्र्यांनी रविवारी केली. त्यामुळे आघाडीतील केंद्रीय तपास यंत्रणामुळे त्रस्त झालेल्या नेत्यांचा राज्य सरकारवरचा दबाव वाढला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात राज्य सरकारने एसआयटी नेमण्याची मागणी केली. ते म्हणाले, "मुंबईत सिनेसृष्टी आहे, ती मुंबईचे वैभव आहे. या सिनेसृष्टीस बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. एनसीबीच्या माध्यमातून हे षडयंत्र रचले गेले आहे. जेणेकरुन मुंबईतून या लोकांनी निघून जावे, असा दावा संजय राऊत यांनी केला.


"अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर एनसीबी नावाचा प्रकार दिसून आला. एनसीबी मुंबईत फारच कामाला लागली आहे. जणू काही मुंबईत घराघरात चरस-गांजाचं पिक काढले जाते, महाराष्ट्राचे लोक अफू-गांजाचा व्यापर करतात, अशी बदनामी केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात स्यूमोटो (स्वत:हून)  कारवाई केली पाहिजे. तसेच एसआयटी मार्फत चौकशी केली गेली पाहिजे', अशी मागणी राऊत यांनी केली.


राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीसुद्धा  एसआयटीची मागणी केली. ते म्हणाले, बाॅलीवूडमध्ये दहशत निर्माण केली जात आहे, त्यातुन वसुली केली जात आहे. आता त्यांचाच मणूस समोर येऊन सांगतो आहे. या घटनेची दखल घेऊन एसआयटी नेमून चौकशी केली पाहिजे. या प्रकरणी आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी बोलणार आहोत, असे मलिक यांनी सांगितले.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उच्चस्तरीय चौकशीची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात नव्या पुराव्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा साक्षीदाराने केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन उच्चस्तरीय चौकशी करावी, असे पटोले यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, बरे झालं लोकांच्या समोर खरी वस्तुस्थिती यायला लागलीय आहे. भाजपचे केंद्रसरकार आपल्या एजन्सींचा दुरुपयोग करत असून लोकांकडून पैसे उकळण्याचे काम करत आहे, हे उघड झाले, असे पाटील यांनी सांगितले.
------------------------

दलित म्हणून निशाणा : आठवले

सत्ताधाऱ्यांकडून समीर वानखेडे यांची पोलखोल केली जात असतानाच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मोठे विधान केले. ते म्हणाले, समीर वानखेडे यांना संरक्षण मिळावे, अशी आमची मागणी आहे. राज्यपालांना भेटून त्याबाबतची मागणी करणार आहे. वानखेडे हे दलित अधिकारी असल्यानेच त्यांना निशाणा केले जाते आहे, असा आरोप आठवले यांनी केला.