मंत्री अनिल परब ईडी कार्यालयात

मुंबई
 28 Sep 2021  201

परिवहन मंत्री अनिल परब यांची ७ तास चौकशी

लोकदूत वेबटीम 

मुंबई 28 सप्टेंबर 


शंभर कोटी वसुली प्रकरणात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना 'ईडी'ने समन्स बजावून मंगळवारी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आज सकाळी १२ वाजता परब हे ईडी कार्यालयात हजर झाले. ईडीकडून तब्बल सात तास अनिल परब यांची चौकशी करण्यात आली. संध्याकाळी सात वाजता ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ईडीच्या सर्व प्रश्नांना आपण उत्तर दिल्याचे म्हटले. 'आज मला जे समन्स आले होते, त्या समन्सच्या अनुषंगाने मी ईडी कार्यालयात आलो, आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला जे प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत. ईडी ही एक अॅथोरिटी आहे, आणि अॅथोरिटीला उत्तरे देणे ही माझी जबाबदारी आहे, असे परब यांनी म्हटले.

मी सहकार्य करणार, कारण मला प्रश्न विचारण्याचा अधिकार अॅथोरिटीला आहे, कोणा एका व्यक्तीला नाही, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले. चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यामांशी बोलताना परब म्हणाले, मी चौकशीला जात आहे. मी शिवसेना प्रमुखांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगितले आहे की मी कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम केलेले नाही.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल परब यांना ईडीने दोनदा समन्स बजावले आहे. याआधी परब यांनी चौकशीसाठी १४ दिवसांची मुदत मागितली होती. ईडीने ही विनंती मान्य केली होती. त्यानंतर पुन्हा परब यांना समन्स बजावले होते. त्यानुसार परब आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले होते.
-------------
-आरोप काय ?
बृहन्मुंबई महापालिकेतील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये खंडणी गोळा करण्याची सूचना अनिल परब यांनी जानेवारी २०२१ मध्ये आपल्याला केली होती, असा जबाब सचिन वाझे याने 'एनआयए'कडे दिला आहे.
------------