परमबीर सिंह यांच्या अटकेचे समन्स जारी

मुंबई
 07 Sep 2021  211


-चांदीवाल आयोगासमोर गैरहजर राहिल्याने वाॅरंट

-आयोगासमोर हजर राहून मिळावा लागेल जामीन

 लोकदूत वेबटीम

मुंबई 7 सप्टेंबर

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी रुपयांच्या वसुलीसंदर्भात भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदीवाल आयोगाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधीत वॉरंट जारी केले आहे. वारंवार निर्देश देऊनही परमबीर सिंह आयोगापुढे हजर राहात नसल्याने मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आहे.


दरम्यान परमबीर यांनी चांदिवाल आयोगाच्या चौकशीला याचिकेतून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ज्यावर आता लवकरच सुनावणी होणे अपेक्षीत आहे.


मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांच्यावरील १०० कोटी वसुली प्रकरणी याचिकेची दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. तर महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची समांतर न्यायालयीन चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगामार्फत चौकशी सुरू आहे. 

चांदीवाल चौकशी आयोगाने परमबीर सिंह यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र प्रतिज्ञापत्र सादर न करता परमबीर सिंह चौकशीला सातत्याने गैरहजर राहिले होते. याची दखल घेत आयोगाने जून महिन्यात परमबीर यांना 5 हजारांचा, 19 ऑगस्टला 25 हजारांचा आणि  25 ऑगस्टला पुन्हा 25 हजाराचा दंड ठोठावला होता.


दंडाची रक्कम मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत जमा करण्याचे निर्देश देत 30 ऑगस्टला सुनावणी निश्‍चित केली होती. मात्र या सुनावणीलाही परमबीर गैरहजर राहील्याने आयोगाने संताप व्यक्त करत त्यांना अखेरची संधी दिली होती.

------------------------------

आयोगाने राज्याचे पोलील महासंचालक यांना परमबीर सिंह प्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी एका जेष्ठ अधिका-याची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत. परमबीर यांना आता आयोगापुढे जातीने हजर राहून अटक वाॅरंटबाबत जामीन मिळवावा लागणार आहे.