अध्यक्ष पदावरून मुख्यमंत्री -राज्यपाल यांचा संघर्ष उफाळणार

विधिमंडळ
 27 Dec 2021  415

* अध्यक्ष निवडणुकीला राज्यपालांचा खो 

* विधानसभा अध्यक्ष निवड बारगळण्याची चिन्हे 

आघाडी सरकारसमोर नवा पेच

लोकदूत वेबटीम 
 मुंबई 27 डिसेंबर 


विधानसभा अध्यक्षपदासाठी खुल्या पद्धतीने म्हणजे आवाजी मतदानाने निवडणूक घेणे हे घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा देत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला  खो घातला आहे. राज्यपालांच्या या विरोधामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बारगळण्याची  चिन्हे असून राज्यपालांच्या भूमिकेमुळे आघाडी समोर पेच निर्माण झाला आहे. 

महाविकास आघाडी सरकारने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज मंगळवारी विधानसभा अध्यक्षपदाची  निवडणूक घेण्याची तयारी केली होती. त्यासाठी आघाडी सरकारच्यावतीने बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेऊन  त्यांना  अध्यक्ष निवडणुकीचा प्रस्ताव सादर करून निवडणूक घेण्यास मान्यता देण्याची विनंती केली होती. त्यावेळी राज्यपालंनी यासंदर्भात कायदेशीर अभिप्राय घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आज  विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदलाची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचे राज्य सरकारला कळविले आहे.  राज्यपालांच्या या भूमिकेमुळे आघाडी सरकारची कोंडी झाली आहे. 

 राज्यपालांच्या या अभिप्रायांनंतर  आता राज्य  सरकारकडून राज्यपालांना पुन्हा  पत्र पाठवले जाण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी जो मुद्दा उपस्थित केला त्यावर चर्चा  करून अध्यक्ष निवडणुकीचा  तिढा सोडवण्याचा प्रयत्न आहे. हा तिढा सुटला तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निवडणूक होऊ शकते, असा दावा एका मंत्र्याने केला.

राज्यपालांच्या माध्यमातून भाजपचा  अडथळा : नाना पटोले  

दरम्यान, भाजप राज्यपालांच्या  आडून छुपा अजेंडा राबवत आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु राज्यपालांच्या माध्यमातून भाजप जाणीवपूर्वक यात अडथळा आणत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  यांनी केला आहे. 

 विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनेच होईल आणि  उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस आहे. विधिमंडळाने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य नाही, असेही  पटोले यांनी स्पष्ट केले.

 नियम बदलण्याचे अधिकार विधिमंडळाला आहेत.  त्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे नियम बदल करण्यात आले आहेत. आवाजी मतदानाने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परंपरा लोकसभेतही आहे,  तीच प्रक्रिया महाराष्ट्राने स्वीकारली आहे . इतर राज्यातही तीच परंपरा पाळली जाते. महाराष्ट्रातही विधान परिषद सभापतींची निवडणूक आवाजी पद्धतीनेच होते. त्यामुळे विधिमंडळाने घेतलेला निर्णय घटनाबाह्य नसून तसे पत्र राज्यपालांना पाठवले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. 

तर विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त पद्धतीने न घेणार्‍या राज्य सरकारला नेमकी कसली भीती?असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कला आहे.  ही निवडणूक गुप्त मतदानानेच व्हावी, अशी भाजपची मागणी आहे. आपल्या आमदारांवर महाविकास आघाडी सरकारचा विश्वास नसल्याने हा निर्णय घेतल्याचा आरोपही  त्यांनी केला विधानसभा नियमांमध्ये बदल करण्याबाबत बैठक घेण्याचा अधिकार केवळ  अध्यक्षांनाच असून तो उपाध्यक्षांना नाही. त्यामुळे निवडणूक नियमातील बदल घटनाबाह्य असल्याचे मतही  फडणवीस यांनी व्यक्त केले.