केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई
 19 Aug 2021  222

शिवसेनेचा घडा भरला ; मुंबईवर भाजपचा झेंडा फडकणार

-नारायण राणे यांच्या जनादेश यात्रेचा मुंबईतून प्रारंभ

लोकदूत वेबटीम 

 मुंबई 19 ऑगस्ट 


गेली ३२ वर्षे मुंबईत मनमानी कारभार करणाऱ्या शिवसेनेचा पापाचा घडा भरला असून आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकेल, तो फडकवण्याची जबाबदारी माझी आहे, असा दावा केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला.
     केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गुरुवारी सकाळी १० वाजता राणे यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. तेथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन राणे यांनी जनादेश यात्रेचा प्रारंभ केला.


यात्रेची पहिली सभा मुख्यमंत्र्यांचे निवास्थान असलेल्या ‘मातोश्री’च्या अंगणात म्हणजे वांद्रे भागात झाली. पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या स्थानिक आमदार तृप्ती सावंत यांनी सभेची तयारी केली होती. यावेळी राणे यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.
राणे म्हणाले, पूर्वीची शिवसेना आता नाही. सेनेची केव्हाच अधोगती झाली. शिवसैनिकांना मातोश्रीचे दरवाजे आता बंद असतात, असे सांगून आघाडीचे तीन काय दहा पक्ष एकत्र येऊ द्या, मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणारच आणि ती सर्वस्वी माझी जबाबदारी आहे., असे आव्हान राणे यांनी दिले.


माहिम कोळीवाड्यात जनसंवाद साधल्यानंतर यात्रा दादरच्या शिवाजी पार्कात गेली. तेथे राणे यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. यावेळी राणे म्हणाले, आज मी बाळासाहेबांमुळेच आहे. ते हयात असते तर त्यांनी माझ्या पाठीवर नक्कीच हात ठेवला असता. त्यांचा हात नाही, पण त्यांचे आर्शिवाद माझ्याबरोबर आहेत, असे राणे म्हणाले.
यावेळी राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. हे उद्धव सरकार नसून महाराष्ट्रला उद्वस्त करायला निघालेले सरकार आहे, असे ते म्हणाले. यानंतर राणे यांनी सावरकर स्मारक येथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि चैत्यभुमीवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
 देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मी दिल्लीत आज आहे, असे सांगत अनेकवेळा राणे यांनी फडणवीस यांचा उल्लेख केला. मुंबईत संततधार असुनही जनादेश यात्रेला प्रतिसाद होता. राणे यांच्या यात्रेने भाजपने मुंबईत शक्तीप्रदर्शन केले असून मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा बिगुल फुंकल्याचे मानले जात आहे.