भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई
 03 Aug 2020  253

*मंगलप्रभात लोढांच्या नेतृत्वात आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट*

*  शिष्टमंडळाच्या मागण्यांवर राज्यपालांची मुख्य सचिवांशी चर्चा 
* धार्मिक स्थळे त्वरित उघडण्याची भाजपाची मागणी 
* गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्वरित दिलासा देण्याचीही भाजपाची मागणी 

* सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांना होत असलेल्या असहकाराबद्दल भाजपाची तक्रार 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 3 ऑगस्ट 

भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या शिष्ट मंडळाने आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यातील सर्व धार्मिक स्थळे तातडीने उघडण्याची मागणी केली. बुधवारी ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिर भूमिपूजन प्रसंगी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी खुली असावीत असा आग्रह या शिष्टमंडळाने धरला. भाजपच्या या मागणीवर राज्यपाल महोदयांनी मुख्य सचिवांशी दूरध्वनीवरून चर्चा करून या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. 

भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली  माननीय राज्यपाल महोदयांना भेटण्यास गेलेल्या भाजप आमदारांच्या शिष्टमंडळात विधान परिषद विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकर, विजय भाई गिरकर,  योगेश सागर, कालिदास कोळंबकर, सुनील राणे,मानिषाताई चौधरी, राहुल नार्वेकर,   यांचा समावेश होता. 
यावेळी प्रवीण दरेकर यांनी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना होत असलेल्या प्रशासनिक जाचाबद्दलही राज्यपालांकडे तक्रार केली. ई-पास  बाबत असलेले घोळ, गावी क्वारंटाईन होण्याची सक्ती, कोकणातील वैद्यकीय सुविधांची दुरवस्था, प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीची अनुपलब्धता अशा अनेक बाबतीत राज्यपालांना अवगत करण्यात आले. याहीबाबत राज्यपालांनी मुख्य सचिवांनी स्वतःच्या पातळीवर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. 

भाजप आमदारांच्या शिष्टमंडळाने मा.राज्यपालांकडे सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारकडून बिहार पोलिसांना होत असलेल्या असहकाराबद्दलही तक्रार केली. सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात राज्य सरकारने कुणालाही न वाचवता या प्रकरणातील मुख्य गुन्हेगारांना पकडण्यास मदत केली पाहिजे अशी मागणी शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे.