परीक्षा रद्दा करा,राज ठाकरेंचे राज्यपालांना पत्र

मुंबई
 26 May 2020  316

 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 26 मे 

राज्यातील कोरोना  विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन आणि विद्यापीठाच्या परीक्षेवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तप्त असतानाच आता यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे.त्यांनी राज्यपाल  भगतसिंग कोश्यारी यांनी पत्र लिहून विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांना पत्र  लिहिले आहे.आपण विद्यापीठाचे कुलगुरू आहात त्यामुळे हे पत्र आपल्याला उद्देशून लिहीत आहे. विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांच्याबाबत सुरु असलेल्या गोंधळाविषयी आपण अवगत असालच आणि ह्यासंबंधी अनेक सूचना,प्रस्ताव राज्यातील विविध विद्यापीठाचे कुलगुरू ह्या नात्याने तुमच्याकडे आले असतीलच. पण मे महिना संपत आलाय तरी ह्या परीक्षांचा निर्णय होत नाहीये आणि ह्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे हे मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे.कोरोनामुळे उदभवलेली परिस्थिती इतकी भीषण आहे की देश गेले २ महिने टाळेबंदीत आहे आणि सध्याची किमान मुंबई आणि पुणे परिसरातील परिस्थिती पाहता हा भाग अजून किती काळ टाळेबंदीत राहील ह्याचं भाकीत कोणीच करू शकत नाही आणि जर टाळेबंदी शिथिल झाली तर ह्याचा अर्थ कोरोना संपला असा होत नाही असे ठाकरे यांनी राज्यपालंना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी ? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.ह्या रोगाचा प्रादुर्भाव किती जबरदस्त आहे हे तुम्ही देखील जाणता असं मी मानतो. मग इतक्या मोठ्या संख्येने ह्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घराबाहेर काढून त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आरोग्य धोक्यात घालण्यामागचं नक्की प्रयोजन काय ? टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्थेचं होणारं अपरिमित नुकसान जाणून देखील देशाने इतकी मोठी टाळेबंदी झेलली. का तर जीव वाचला तर पुढे सगळं शक्य आहे. मग हाच न्यायाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत आहे ? बरं परीक्षा रद्द करणे म्हणजे सरसकट विद्यार्थ्यांना पास करणं असा होत नाही. आधीच्या सेमिस्टर्सच्या किंवा महाविद्यालयांनी घेतलेल्या अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारावर किंवा त्यांना काही प्रोजेक्ट्स देऊन किंवा इतर अनेक पद्धतीने विद्यार्थ्यांचा अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करता येईल. शिक्षणतज्ज्ञांनी ह्या विषयीचे मार्ग तुम्हाला सुचवले असतील. पण जर ते नसतील तर आमचं शिष्टमंडळ विद्यापीठांना याविषयी नक्की मार्गदर्शन करेल असेही ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

आज मुंबई विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी हे अनेक किलोमीटरचा प्रवास करून त्यांच्या परीक्षाकेंद्रावर पोहचतात.आजच्या परिस्थितीत अशा हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचणं सुद्धा शक्य होणार नाही.राज्यात सध्या कोरोनामुळे अनिश्चितेचे वातावरण निर्माण झाले आहे.किमान त्यात परीक्षा लांबणीवर पडण्याची टांगती तलवार तरी त्यांच्या डोक्यावर नको,त्याऐवजी आधीच्या गुणांच्या आधारे निकाल निश्चितेचे एक प्रारूप लवकर ठरवून अंतिम परीक्षांचे निकाल लागले तर किमान ह्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मार्ग मोकळा होईल.आज एमबीए पासून इतर परीक्षांच्या सीईटीचे निकाल लागले आहेत पण विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी परीक्षेविषयी अनिश्चितता आहे याला अर्थ नाही.निव्वळ विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून आणि ही अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन ह्या परीक्षा रद्द कराव्यात आणि ह्यात कुठल्याही राजकारणाला थारा देऊ नये, असेही राज ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.