साहेबराव गायकवाड यांच्या मृत्यु ची सीआयडी चौकशी करा

मुंबई
 08 May 2020  369

*  भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची मागणी
लोकदूत वेबटीम 
मुंबई 8 मे 

बदलीसाठी मंत्रालयातून दबाव आल्याच्या तनावामुळे पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचा हृदयविकाराने मृत्यु झाला. त्यामुळे गायकवाड़ ह्यांच्या अकस्मिक मृत्यूची सी. आय. डी. मार्फत चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे कै. गायकवाड यांची अवघ्या पाच महिन्यांच्या आत बदली करण्याचा आदेश कोणाच्या सहीने निघाला, ती माहिती जनतेसमोर आली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शुक्रवारी केली.
  
पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांचे काल कार्यालयातच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन दुर्दैवी निधन झाले. ही घटना जेवढी दु:खदायक आहे तेवढीच संतापजनक देखील आहे. कै. गायकवाड हे एक अत्यंत कर्तव्यदक्ष, कार्यक्षम व प्रामाणिक अधिकारी होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूचा एकूण घटनाक्रम बघता त्यांचा मृत्यू नैसर्गिक वाटत नाही. अवघ्या चार महिन्यांपूर्वी त्यांची बदली साताऱ्याहून पुण्याला झाली होती. असे असताना परत त्यांची बदली करण्याचा अट्टाहास कोणत्या राजकीय नेत्याने धरला होता? त्यामागची कारणे काय? स्वत:च्या मर्जीतल्या माणसाला मोक्याच्या पदावर आणून बसवण्यासाठी एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या मागे हात धुवून कोण लागले होते? कै. गायकवाड ह्यांच्या बदलीला मॅटने स्थगिती दिल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर दबाव आणून आणि त्यांना धमकावून बदली मान्य करायला भाग पाडण्यासाठी कोण अधिकारी कार्यरत होता? ‘अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे’ हेच पद मिळाले पाहिजे यासाठी कोणता अधिकारी धडपडत होता? हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत.
ते म्हणाले की, कै. गायकवाड यांच्या मृत्यूपूर्वीच्या अठ्ठेचाळीस तासातील त्यांच्या फोन्सचे सर्व रेकॉर्ड तपासले तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील. त्यासाठी कै. साहेबराव गायकवाड ह्यांच्या दुर्दैवी मृत्यूची सी. आय. डी. मार्फत चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे कै. गायकवाड यांची अवघ्या पाच महिन्यांच्या आत बदली करण्याचा आदेश कोणाच्या सहीने निघाला व त्यात बदलीची कोणती करणे नमूद केली होती ती माहिती देखील जनतेसमोर आली पाहिजे. अशी मागणी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांकडे जाहीरपणे करत आहे.