राज्यातील दोन कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे

मुंबई
 25 Mar 2020  295


*नमुने निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडले

*उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदन*


लोकदूत वेबटीम 

मुंबई २५ मार्च 

पुण्यातील कोरोना बाधीत दाम्पत्याचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने व ते या संसर्गातून बरे झाल्याने त्यांना आज नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. गुढीपाडव्याच्या दिवशी ही चांगली बातमी आल्यामुळे कोरोना बरा होऊ शकतो असा संदेश नागरिकांमध्ये जण्यास मदत झाली आहे. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अभिनंदन केले आहे. यापूर्वी काल मुंबई आणि औरंगाबाद येथील बरे झालेल्या रुग्णांनाही रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज राज्यात दिवसभरात १५ नविन रुग्ण  आढळून आले आहेत. एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १२२ झाली आहे.
या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ७, सांगलीमधील  इस्लामपूरचे ५ तर कल्याण डोंबिवली, नवी मुंबई व पनवेल येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. . या नवीन बाधित रुग्णांपैकी  सांगलीचे ५ रुग्ण हे  काल बाधित आढळलेल्या ४ रुग्णाचे निकट सहवासित आहेत.  नवी मुंबईतील ५७ वर्षीय पुरुष हा यापूर्वी करोना बाधित आढळलेल्या आणि मृत्यूमुखी पडलेल्या फिलीपाईन नागरिकाच्या संपर्कातील व्यक्ती आहे. कामोठे – पनवेल इथे आढळलेला ३८ वर्षाचा पुरुष हा त्रिनिदाद येथे गेला होता तर मुंबईतील अनुक्रमे २७ व ३९ वर्षाचे दोन पुरुष रुग्ण हे अमेरिका आणि यु ए ई या देशांमध्ये प्रवास करुन आले आहेत तर इतर ५ रुग्ण हे बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आहेत.  कल्याण डोंबिवली परिसरातील २६ वर्षाच्या तरुणाने तुर्कस्थानचा प्रवास केलेला आहे. 
*राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील*
पिंपरी चिंचवड मनपा                १२    
पुणे मनपा                                 १८    
मुंबई                                  ४८    
सांगली                                   ९    
नवी मुंबई , कल्याण डोंबिवली    ६    
नागपूर, यवतमाळ         प्रत्येकी  ४    
अहमदनगर, ठाणे          प्रत्येकी ३    
सातारा, पनवेल                  प्रत्येकी २    
उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार,पुणे ग्रामीण    प्रत्येकी  १    
एकूण     १२२    मृत्यू ३
  १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत २९८८ जणांना भरती करण्यात आले होते. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी २५३१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १२२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. 
सध्या राज्यात १४,५०२ लोक घरगुती अलगीकरणात तर ९३२ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 
आरोग्य खात्यामार्फत आवाहन 
1.    सरकारी तसेच खाजगी आरोग्य संस्था मधील बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभाग नेहमीप्रमाणे खुले असावेत. 
2.    रुग्णालय स्तरावर फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी वेगळी ओपीडी असावी. 
3.    परदेशी प्रवासाचा इतिहास अथवा करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात न आलेल्या सर्दी खोकला असलेल्या रुग्णास विनाकारण करोना चाचणीचा आग्रह धरु नये. 
4.    लॉकडाऊनच्या काळात  कामानिमित्त घराबाहेर पडणा-या सामान्य नागरिकांना काही ठिकाणी पोलिस मास्क घालण्याबाबत सक्ती करत असल्याबाबत काही तक्रारी कॉलसेंटरला प्राप्त झाल्या आहेत. परदेशातून आलेले लोक, करोना बाधित रुग्ण, करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात असणा-या व्यक्ती आणि मेडिकल स्टाफ या शिवाय इतर सामान्य नागरिकांनी मास्क वापरण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे मास्क घालण्याबाबत अशी सक्ती कोणीही करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे.