....महाराष्ट्राचेही तुकडे पाडतील

महाराष्ट्र
 09 Aug 2019  462

बहुमताच्या जोरावर उद्या महाराष्ट्राचेही तुकडे पाडतील..

राज ठाकरे यांनी व्यक्त केली भीती

लोकदूत वेबन्यूज टीम 

मुंबई, ९ ऑगस्ट 

 

- काश्मीरमध्ये ३७० कलम हटवायचे म्हणून इंटरनेट बंद केले गेले, टीव्ही बंद केले गेले, कर्फ्यू लावला गेला. उद्या असेच महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ ह्यांच्याबाबतीत घडू शकते, आणि हे का घडतेय तर बहुमताच्या जोरावर.., अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रातल्या भारतीय जनता पार्टी सरकारवर टीका केली.

मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरात पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. वर्तमानपत्रात बातम्या आल्या की मला ईडीची नोटीस आली, मला अशी कोणतीही नोटीस आली नाही. मी पत्रकारांना म्हटले की अशाच धमक्या तुमच्या मालकांना दिल्या जात आहेत आणि म्हणून तुमची कितीही इच्छा असली तरी तुम्ही सत्य मांडू शकत नाहीत. एक-दोन अपवादात्मक माध्यमे सोडली तर कोणीच सत्य मांडू शकत नाही आणि ह्या माध्यमांवरपण वरून दडपण आणले जात आहे आणि हे सगळे बहुमताच्या जोरावर.., असे ते म्हणाले.

माहिती आयुक्तांचा कार्यकाळ, त्यांचा पगार सरकारने ठरवायचा असा कायदा पारित करून घेतला. माहिती आयुक्तांची स्वायत्तता संपुष्टात आणली गेली. हे का? तर मोदींचे नक्की किती शिक्षण झाले आहे, ह्याची माहिती, माहिती अधिकाराखाली मागवली गेली. तेव्हापासून ह्या कायद्यावर अंकुश आणायचा निर्णय घेतला गेला. हे सगळे बहुमताच्या जोरावर.. दहशतवाद कायदा सध्याचा कायदा जो पारित करून घेतला आहे त्यानुसार एका व्यक्तीला दहशतवादी ठरवायचा अधिकार सरकारला म्हणजेच अमित शाह ह्यांना मिळाला. त्यामुळे कोणी एखादे राजकीय किंवा सामाजिक आंदोलन केले, तर त्याला दहशतवादी ठरवून त्याला अटक करायचा अधिकार ह्या कायद्याने अमित शाहंना आले. हे सगळे बहुमताच्या जोरावर.., असेही ठाकरे म्हणाले.

आज पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे परिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री फक्त हवाई पाहणी करत आहेत. गिरीश महाजन तर सेल्फी घेत होते. आणि हे असे सगळे करू शकतात कारण त्यांना माहिती आहे की कितीही कुणीही संताप व्यक्त करू दे, टीका करू दे, ते निवडून येणारच आहेत. हा सत्तेचा माज आहे. महाराष्ट्र भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने बाळा नांदगावकरांना सांगितले की भाजप सोडून महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्ष एकत्र जरी आले तरी आम्हीच जिंकणार कारण ईव्हीएम मशीन आमच्या ताब्यात आहेत, असे ते म्हणाले.

मी मध्यंतरी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेतली. त्यानंतर सोनिया गांधींची भेट घेतली, ममता बॅनर्जींची भेट घेतली, त्यात ईव्हीएम भाजप कशा पद्धतीने वापरत आहे हे ह्या दोन्ही नेत्यांना सांगितले. त्यांनीदेखील हा धोका मान्य केला. त्यांनी सांगितले की, आम्ही ह्या मुद्द्यावर तुमच्यासोबत आहोत. राजकीय पक्ष प्रचार करणार, सभा घेणार, पैसे खर्च करणार आणि तरीही जर भाजप ईव्हीएमच्या जोरावर मतदान हवे तसे फिरवणार असेल तर राजकीय पक्ष तुल्यबळाने कशा निवडणूक लढवणार? लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ३५० जागा येतील अशा घोषणा भाजपचे नेते करत होते, तसेच झाले. आता पण विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर २२०, २३० असे आकडे घोषित करत आहेत आणि हा आकडा खरा वाटावा म्हणून भावनिक विषय पुढे करायचे आणि मग ईव्हीएमच्या जोरावर निवडणुका जिंकायच्या. २०१४ च्या विधानसभा निवडणुका, २०१७ च्या महापालिका निवडणुकांत आपल्या पक्षाचा जो निकाल समोर आला तो मला मान्यच नाही, कारण ईव्हीएमच्या जोरावर ह्यांनी मतदान फिरवले, असे राज ठाकरे म्हणाले.

जर समजा एखाद्या मतदारसंघात १ लाख मतदान झाले असेल तर तिथे १ लाख २० हजार मतदान मोजणीच्या वेळेस समोर येऊच कसे शकते? बरे, निवडणूक आयोगात जाऊनदेखील न्याय मिळत नाही, ना न्यायालयांमध्ये. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या वेळेस शिवसेनेचे काही खासदार, त्यांना मंत्री म्हणून नको होते, नेमके तेच लोक पाडले गेले, अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ पडले, आढळराव पाटील, अनंत गीते पडले.. आणि काँग्रेसचा एक खासदार निवडून आला जो शिवसेनेत होता. २३ मेला लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात २८ पैकी २५ जागांवर भाजपचे खासदार निवडून आले, तर पुढे चारच दिवसात त्याच राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत काँग्रेस मोठ्या प्रमाणावर निवडून आली. कशी? तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या मतपत्रिकांवर घेतल्या गेल्या. हे लोक राम मंदिराबद्दल बोलत आहेत. जेव्हा सीतामाई लंकेवरून परत आल्या तेव्हा एका धोब्याने त्यांच्यावर शंका घेतली, तेव्हा श्रीरामचंद्रानी सीतामाईंना अग्निपरीक्षा द्यायला लावली. जर तुम्ही रामभक्त आहात आणि जर जनतेला ईव्हीएमवर शंका आहेत. तर मग तुम्ही जनतेचा मताचा आदर करत निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, असेही ते म्हणाले.

ईव्हीएमविरूद्धचा मोर्चा तूर्तास स्थगित

ह्याच मागणीसाठी आपण एक अर्ज बनवला आहे, या पुढील सर्व निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात ह्या मागणीसाठीचा हा अर्ज आहे. माझ महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे की तुम्ही लोकांच्या घरी जा, त्यांना मुद्दा समजावून सांगा आणि अर्ज भरून घ्या. आपण हे सगळे अर्ज निवडणूक आयोगाला देणार आहोत. ह्या देशातील लोकशाही जिवंत करायची असेल तर पुन्हा मतदान मतपत्रिकेवर व्हायला हव्यात. देशातील निवडणुका फक्त मतपत्रिकेवर व्हाव्यात ह्यासाठीचा मोर्चा २१ तारखेला होणार होता. पण, तो सध्याची पूरपरिस्थिती लक्षात घेऊन पुढे ढकलला आहे. त्याची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.