काँग्रेस राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघ अनुकूल

महाराष्ट्र
 04 Jun 2023  110
 
-काँग्रेस नेत्यांचा कार्यकर्त्यांशी चर्चेतून अंदाज
-४१ लोकसभा मतदारसंघाचा आढावा पूर्ण
 
लोकदूत वेबटीम
मुंबई 4 जून
 
कर्नाटक विधानसभेत मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे राज्यातील काँग्रेस पक्षात उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळेच राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत यश प्राप्त करण्यासाठी काँग्रेस(maharashtra congres )पक्षाने शुक्रवारी व शनिवारी काँग्रेसने राज्यातील ४१ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यात १५ लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला अनुकूल असल्याचा निष्कर्ष काँग्रेस नेत्यांनी काढला आहे. यात 15 पैकी १० मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाचे आहेत. आगामी लोकसभेसाठी 
प्रदेश काँग्रेसने महाविकास आघाडीतील (mahavikas aaghadi )जागा वाटपाचा गृहपाठ सुरु केला आहे. म्हणूनच मुंबईत दोन दिवस लोकसभा मतदारसंघाचा आढावा सुरु होता. प्रत्येक मतदारसंघातील आमदार, माजी आमदार, माजी खासदार जिल्हाध्यक्ष यांच्याशी ज्येष्ठ नेत्यांनी संवाद साधला व शिवसेनेतील बंडानंतरची स्थानिक परस्थिती समजून घेतली . मुंबईतील ६ आणि चंद्रपूर अशा ७ मतदारसंघाचा आढावा बाकी आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रवादीसोबत युती होती. काँग्रेसने २६ जागा लढवल्या होत्या. पैकी चंद्रपुरची एक जागा काँग्रेसच्या पदरात पडली. यावेळी राष्ट्रवादी, ठाकरे यांची शिवसेना व काँग्रेस यांची महाविकास आघाडी संयुक्तपणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीस सामोरी जाणार आहे. यावेळी राज्यात काँग्रेसच्या वाट्यास किती जागा येतील, याची उत्सुकता आहे.
आतापर्यंत ४१ मतदारसंघाचा आढावा पार पडला. पैकी १५ मतदारसंघ आम्हाला अनुकूल आहेत, असा आमचा अंदाज आहे. आणखी ७ मतदारसंघाचा आढावा बाकी आहे. सर्व मतदारसंघाचा आढावा झाल्यावर आम्ही ठोस निष्कर्षापर्यंत पोचू. मात्र महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष हा काही लहान भाऊ नाही, असे आम्हाला आढावा बैठकीतून दिसून आल्याचे एका काँग्रेस नेत्याने सांगितले.
आजच्या बैठकीत पुणे, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, सोलापूर, माढा, बारामती, शिरुर, मावळ, रायगड, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड, ठाणे, भिवंडी व कल्याण या मतदारसंघाचा आढावा घेतला गेला.
-----------