नवाब मालिकांना 8 दिवसांची ईडी कोठडी

महाराष्ट्र
 24 Feb 2022  272

मंत्री मलिक यांना ८ दिवस ईडी कोठडी

-दाऊदच्या बहिणीची काही मालमत्ता मलिक यांनी घेतल्याचा ईडीचा दावा
-लढेंगे और जितेंगे... असा नवाब मलिक यांचा पवित्रा
-ईडी कार्यालय व सत्र न्यायालयाबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची निदर्शने

लोकदूत वेबटीम 

मुंबई 24 फेब्रुवारी 


राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी 3 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली. मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी पहाटे ईडी अधिकारी गेले. त्यांना ईडी कार्यालयात आणण्यात आले. तिथे त्यांची आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय चाचणी करून त्यांना अटक केली. ईडीने चौदा दिवसांची कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयाने ८ दिवसांची कोठडी दिली.

अडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लाँड्रिंगशी संबधित प्रकरणात ईडीने आज सकाळी ७ वाजता मलिक यांच्या घरी छापा टाकला होता. राष्ट्रीय तपास संस्थेच्या एफआयआरच्याआधारे सुरू असलेल्या तपासाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. दाऊदचा भाचा अलिशाह पारकर व छोटा शकीलचा माणूस सलीम फ्रुटच्या जबानीनुसार मलिक यांना अटक करण्यात आली आहे.

लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला काश्मिरातील कारवायांसाठी आर्थिक पुरवठा करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयएने दाऊदविरुद्ध बेकायदेशीर कृत्यविरोधी कायद्यानुसार (यूएपीए) गुन्हा दाखल केला. यांत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्यानेच आता ‘एनआयए’ च्या एफआयआर आधारे ‘ईडी’ने तपास सुरू केला आहे. त्याअंतर्गतच दाऊदची बहिण हसिना पारकरची मलिक यांनी काही मालमत्ता कमी किमतीत खरेदी केल्याचा आरोप ‘ईडी’ने मलिक यांच्यावर ठेवला आहे.

मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात येत हाेते. तेव्हा मलिक ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर हात उंचावून मुठ दाखवली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मलिकांनी 'लढेंगे और जितेंगे... डरेंगे नही', असे स्पष्ट केले.  

आपल्याला चौकशीची नोटीस देण्यात आली नव्हती, तसेच ईडी कार्यालयात आणल्यानंतर  समन्सवर माझ्या सह्या घेतल्या अशी माहिती मलिक यांनी न्यायालयात दिली.

मलिक यांची चौकशी चालु असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅलार्ड पिअर येथील ईडी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच मलिक यांना सत्र न्यायालयात नेल्यानंतर न्यायालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडी, भाजप आणि केंद्र सरकार यांच्या विरोधात घोषणा देत होते.

मनी लाँड्रींग प्रकरणी अटक होणारे नवाब मालिक हे राज्यातले पहिले मंत्री ठरले आहेत. छगन भुजबळ यांना याच कायद्याखाली अटक झाली होती, पण तेव्हा ते विरोधी बाकांवर होते. तर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजिनामा दिल्यावर त्यांना अटक करण्यात आली होती.
------------------------------
ईडीचे वकील म्हणाले,
अॅड. अनिल सिंग यांनी युक्तीवाद करताना म्हणाले की, दहशतवादी कृत्ये, बनावट नोटा चलनात आणणे, अवैध पैशांचा व्यवहार, हवाला, त्याचे लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-महंमद, अल-कैदा अशा अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशीही दाऊदचे संबंध होते. त्याची बहीण हसीना पारकर हिचाही गुन्ह्यात संबंध होता. कुर्ल्यामध्ये गोवावाला कंपाऊंड ही मालमत्ता हसीनाच्या मालकीची होती. हसीना पारकर चा साथीदार सलीम पटेलने कुमुखत्यारपत्राचा गैरवापर करत हसीना पारकरच्या नावे मालमत्ता विक्री व्यवहार केला आणि तीन कोटी ३० लाख रुपयांची मालमत्ता ५५ लाख रुपयांना नवाब मलिक यांच्या कंपनीला विकली,
--------------------------------------
मलिकांचे वकील म्हणाले,
 अॅड. अमित देसाई यांनी युक्तीवाद करताना म्हटले की, मनी लॉ डरिंग कायदा नंतर त्याच्या खूप आधी मालमत्ता व्यवहार झाला. सन १९९९ ते २००३ मधल्या व्यवहाराचा ईडी आता फेब्रुवारीमध्ये तपास करते आणि कायद्याच्या तरतुदी खूप जुन्या व्यवहारांना कलमे लावली गेली आहेत. मनी लॉडेरिंग कायद्याचा तपास यंत्रणेने गैरवापर चालवला आहे. ईडीच्या रिमांड अर्जाला काहीच आधार नाही. लोकप्रतिनिधीला, मंत्र्याला अटक करून त्याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी संबंध आहेत, असे चित्र तपास यंत्रणेकडून तयार केले गेले आहे.
------------------------