मंत्रालय भ्रष्टाचारचा अड्डा

महाराष्ट्र
 04 Jun 2023  126
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा आरोप
रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा देण्याची केली मागणी
 
लोकदूत वेबटीम 
 मुंबई 4 जून
 
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले सरकार होते. राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. राज्य  सरकार जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, केवळ मोठ मोठे इव्हेंट करुन प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी  केली.
 
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात यांनी वरील आरोप केला. यावेळी थोरात म्हणाले की, राज्यातील सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे. अवकाळीच्या नुकसानीनंतर सरकारने विधानसभेत मदतीची घोषणा केली पण अद्याप ही मदत मिळालेली नाही. कांद्याला अनुदान जाहीर केले पण जाचक अटीमुळे ही मदतही शेतकऱ्याला मिळाली नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, आत्महत्या वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त आहे, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे आणि शिंदे सरकार मात्र इव्हेंट करण्यात मग्न आहे. शिंदे सरकारकडून लोकांना केवळ पोकळ घोषणा मिळाल्याचा आरोप थोरात यांनी केला.
 
पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे उपस्थित होते.
---
-रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा
ओडिशातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ झालेला रेल्वे अपघात शतकातील मोठा अपघात आहे. या अपघातील मृतांची संख्या पाहून मन सुन्न झाले. ओडीशा अपघातीची नैतिक जबाबदारी म्हणून रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेस केली आहे.
--
-क्लस्टर डेव्हलपमेंटच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार
मुंबई आणि परिसरातल्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेत प्रिमियममध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. धारावीचा पुर्नविकास करणाऱ्या अदानी आणि बिल्डर मंत्री लोढा यांच्या सारख्या मोठ्या उद्योगपतींच्या फायद्यासाठीच ही योजना आणली आहे. समूह विकासाला सवलत ही सामूहिक कमिशनखोरी आहे. याविरोधात काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
---