जे बोलतात त्यांच्या विरोधात यंत्रणांचा गैरवापर - शरद पवार

महाराष्ट्र
 24 Feb 2022  236

जे जाहीरपणे बोलतात त्यांच्याविरोधात यंत्रणांचा गैरवापर
-शरद पवार यांची केंद्र, माेदी व भाजपावर कठोर टिका
-महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष नवाब मलिकांच्या पाठिशी
 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 24 फेब्रुवारी 


अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर 'ईडी'ची कारवाई करणार याची पुसट कल्पना होती, आमच्यासाठी हे आश्चर्यकारक नाही. जे जाहीरपणाने बोलतात त्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी आणि भाजप यांच्यावर बुधवारी (ता.२३) केला. माझ्यावरही अशा प्रकारचे आरोप झाले होते, पण ते सिद्ध करू शकले नाहीत, असे पवार यांनी स्पष्ट केले.

आज सकाळी ईडीचे अधिकारी सकाळी ७ वाजता मलिक यांच्या कुर्ला येथील निवासस्थानी पोचले. चौकशीसाठी त्यांना बेलार्ड पिअर येथील ईडी कार्यालयात आणण्यात आले. मलिक यांच्या ईडी कारवाईवर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चौफेर टिका केली आहे.  

शरद पवार पुढे म्हणाले की, कुणी मुस्लिम कार्यकर्ता असला की दाऊदचे नाव घ्यायचे आणि आरोप करायचे, यात काही नवीन नाही. खरे काय हे कुणालाही माहिती नसते. या प्रकाले राज्यात असे वातावरण निर्माण केले होते. आज त्या गोष्टीला २५ वर्ष झाली. पण, आजही तशीच नावे घेऊन लोकांना बदनाम करण्यासाठी दुर्दैवाने सत्तेचा गैरवापर होत आहे, असे पवार यांनी सांगितले.

मलिक असतील किंवा आमच्यासारखे खूप लोक आहेत जे सातत्याने बोलत आहेत. मुखवटे ओरबाडून काढत आहेत. त्यांच्या मागे आता देशभरात ईडी, सीबीआय लावली जात आहे. एखाद्या गोष्टीची वीस वर्षांनी कशी चौकशी होते? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. केंद्रीय तपास यंत्रणाची पोलखोल आपण करीत राहू. ईडीच्या अधिका-यांचा भ्रष्टाचार समोर आणू त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या विरोधात जो कोणी बोलतो त्याच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. भाजपचा हा नवा धंदा आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. आम्ही  याविरोधात सामुहीक लढा देणार आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र सरकारविरोधात आवाज उठवल्यानेच ईडीच्या माध्यमातून कारवाई केलेली असून आम्ही मलिक यांच्या पाठीशी आहोत, अशी भूमिका काँग्रेस प्र्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नवाब मलिक यांच्या चौकशीला आक्षेप घेतला. मलिकांना चाैकशीला बोलावण्यापूर्वी नोटीस देणे बंधनकारक होते. त्यानंतर चौकशीला बोलावले पाहिजे होते, असा दावा वळसे पाटील यांनी केला. हे सूडाचे राजकारण आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना हे शिकवले. गोडसेंची विचारधार अंगिकारून ते नेहमी राजकारण करतात. हा प्रश्न मलिकापुरता प्रश्न नाही, असा दावा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केला.
------------------------------