मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी वर्षा गायकवाड

महाराष्ट्र
 09 Jun 2023  131

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड यांची नियुक्ती


लोकदूत वेबटीम

मुंबई 9 जून

 

काँग्रेसने पक्षात भाकरी फिरवली आहे. काँग्रेसचे मुंबई विभागिय अध्यक्ष भाई जगताप यांच्या जागी प्रा.वर्षा गायकवाड( varsha gayakwad )यांची मुंबई अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असणार आहे. मुंबई महापालिका,लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा महत्वाचा बदल केला आहे. महिला, दलित समाजात असणारा पाठिंबा, राज्य सरकारमध्ये विविध मंत्रीपदावर केलेले काम. मुंबईतील सर्वसामान्य,गोरगरिब लोकांच्या झोपडया-वस्त्यांमध्ये फिरून काम करण्याची आवड या वर्षा गायकवाड यांच्या जमेच्या बाजू आहेत.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी याबाबत पत्रक काढून घोषणा केली आहे. आगामी निवडणुकांच्या द़ष्टीने राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिका निवडणूका तोंडावर आहेत. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूका होतील. कदाचित लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्रही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्वच पक्षांना मुंबईत आपला परफॉर्मन्स चांगला करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवरच काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

वर्षा गायकवाड या सुशिक्षित आहेत. त्या दलित समाजातील आहेत. धारावी हा त्यांचा मतदारसंघ आहे. राज्यातील मंत्रीमंडळात त्यांनी शिक्षणमंत्री म्हणून काम केलेले आहे. दलित समाजात त्यांना स्थान आहे. मंत्रीपदावर असतानाही गोरगरिबांच्या झोपडयांत-वस्त्यांमध्ये फिरून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम त्या करायच्या. मुंबईत काँग्रेसला जनाधार मिळवून देणे. आघाडीतील इतर पक्षांच्या नेत्यांसोबत समन्वय राखणे आणि काँग्रेस पक्षाच्या जागा वाढविण्याचे मोठे काम वर्षा गायकवाड यांना आगामी काळात करावे लागणार आहे.