मंत्री नवाब मलिकांचा भाजपवर हल्लाबोल

महाराष्ट्र
 14 Dec 2021  229

भाजपकडून देशात संविधानिक पदाच्या अधिकारांवर  गदा आणण्याचा प्रयत्न-

* नवाब मलिक यांचा आरोप
निवडणुकांत घोडेबाजार झाल्याचा दावा

लोकदूत वेबटीम 

मुंबई 14 डिसेंबर 

भाजप या देशात संविधानिक पदावर आणि संस्थेच्या अधिकारावर गदा आणण्याचे काम करतेय असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी ( केला आहे.भाजप आमदारांनी निलंबनाला स्थगिती मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता मात्र स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर नवाब मलिक यांनी भाजपव टीकास्त्र सोडले आहे.


‍निलंबनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या भाजप आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे न्याय मागण्याचे आदेश देत स्थगिती देण्यास नकार दिला आहे.शेवटी न्यायालयाने संविधानिक संस्थेचा व पदाचा आदर ठेवून निर्णय दिला आहे अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे.

विधानसभेत कुठलाही आमदार गैरवर्तन करत असेल तर त्यांचे निलंबन करण्याचा अधिकार विधानसभेत अध्यक्षांचा व विधानसभेचा असतो असे असताना त्या अधिकाराला आव्हान देण्याचा प्रयत्न भाजप आमदारांनी केला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाने संविधानिक संस्थेचा व पदाचा आदर ठेवत भाजप आमदारांच्या अर्जावर स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे आता तरी भाजपला संविधानिक संस्थेचे महत्त्व कळलं पाहिजे असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर घोडेबाजार झाला
अकोला आणि नागपूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या बाजुने निकाल लागला असला तरी मोठ्याप्रमाणावर घोडेबाजार झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
या निवडणुकीत मोठ्याप्रमाणावर पैसे देऊन मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाला आहे हे थांबले पाहिजे. ज्याप्रमाणे राज्यसभेत कायदा करण्यात आला आहे त्याचधर्तीवर कायदा झाला पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
राज्यसभेत पैसे घेऊन क्रॉस वोटींग होत असताना संसदेत पक्षाचा व्हीप असेल त्याप्रमाणे मतदान करण्याचा कायदा करण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या बाबतीतही संसदेत कायदा करण्याची गरज आहे असेही नवाब मलिक म्हणाले.