विश्वासनांगरे पाटील यांचा 100 कोटी रुपये वसुलीत सहभाग - सोमय्या

महाराष्ट्र
 01 Oct 2021  182

नांगरे पाटील महाविकास आघाडीचे माफीया


-भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप

लोकदूत वेबटीम 

नवी दिल्ली 1 ऑक्टोबर 


महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोपांची राळ उठवून खळबळ उडवून देणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी  शुक्रवारी मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर निशाणा साधला. नांगरे पाटील हे महाविकास आघाडीचे माफिया आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

किरीट सोमय्या आज दिल्लीत होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे ठाकरे सरकारचे माफिया म्हणून काम करत आहेत. पाटील यांनी बेकायदेशीरपणे मला घरात कोंडून ठेवले. परमबीर सिंग यांच्या 100 कोटींच्या वसुलीत ते सहभागी झाले होते अशी टीका सोमय्या यांनी केली.

नांगरे पाटलांविरोधातील माझ्याकडे पुरावे आहेत. मला पोलिसांनी घरात कोंडले होते. मला नजर कैदेत ठेवण्याचे आदेश नसल्याचे नांगरे पाटील यांना माहीत होते. तरी त्यांनी मुलुंड पोलिसांवर कारवाई केली नाही. नांगरे पाटलांना गृहमंत्री आदेश देत होते तर त्यांनी तसे सांगावे, असे आव्हान सोमय्या यांनी दिले.

भ्रष्टाचारावर कारवाई करण्याचे सर्व काम पोलिसांनी काम करायला हवे होते. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने करायला हवे होते. पण यांनी अँटिकरप्शनलाच करप्ट केले आहे. घोटाळे बाहेर आल्यानंतर आपल्याकडे अशा प्रकारच्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करण्याच्या यंत्रणा आहेत. पण राज्य सरकार तपास करत नाही. त्यात अडथळे आणत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या एजन्सीकडे जावे लागते, असा दावा सोमय्या यांनी केला.
---------------