राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

महाराष्ट्र
 22 Sep 2021  205

राज्यसभेला रजनी पाटील, संजय उपाध्याय यांचे अर्ज


-काँग्रेसने बिनविरोध निवडीचे भाजपला केले आवाहन

-२७सप्टेबर रोजी उमेदवारी मागे घेण्याचा अंतीम दिवस

लोकदूत वेबटीम 

मुंबई 22 सप्टेंबर 

काँग्रेस खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसच्या जम्मू -कश्मीर प्रभारी रजनी पाटील (जि. बीड) यांनी आणि मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांनी बुधवारी (ता. २२) उमेदवारी अर्ज दाखल केले. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा आहे. त्याला भाजप कसा प्रतिसाद देते त्याची उत्सुकता आहे.


रजनी पाटील यांनी अर्ज दाखल केला तेव्हा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आदी उपस्थित होते.


संजय उपाध्याय यांनी अर्ज दाखल करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रदेश कोषाध्यक्ष आमदार मिहीर कोटेचा आदी उपस्थित होते. भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार दिला नव्हता, अशी आठवण काँग्रेसने देत बिनविरोध निवड व्हावी, असे आवाहन केले आहे.


त्याबाबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, जेव्हा निधनासारखी दुर्दैवा घटना घडते, तेव्हा निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करून बिनविरोध निवडणूक करतो. विरोधक परंपरेशी बांधील राहतील आणि निवडणूक बिनविरोध करतील. आम्ही त्यांना विनंतीही करणार आहोत, असे थोरात म्हणाले.


भाजपने मात्र या निवडणुकीचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांशी संबध जोडला आहे. त्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपच्या १२ निलंबित आमदारांना पोटनिवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाला आहे. हा आमच्यासाठी शुभशकुन आहे. उपाध्याय यांच्या वडिलांचे नाव 'रामभक्त' आहे. उपाध्याय यांचे राज्यसभेवर निवडून जाणे उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी उपयुक्त ठरेल,' असे पाटील यांनी म्हटले आहे.

--