किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा दावा

महाराष्ट्र
 21 Sep 2021  206

-परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

लोकदूत वेबटीम 
मुंबई 21 सप्टेंबर 


परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. परब यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

सोमय्या यांनी अॅड. परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हाॅटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसेच प्रादेशिक परिवहन विभागात परब हे बदल्याचे रॅकेट चालवत असल्याचाही जाहीर आरोप केला आहे. त्याबाबतचे पुरावे त्यांनी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाला (आयटी) दिले आहेत.

मात्र, अॅड. अनिल परब यांनी सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावले होते. अॅड. परब यांनी वकील सुषमा सिंग यांच्यामार्फत सोमय्या यांना नोटीस बजावत ७२ तासात माफी मागण्यास सांगितले होते. मात्र  त्यांनी माफी मागितली नसल्याने आज  सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्याचे अॅड. परब यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीसुद्धा किरीट सोमय्या यांच्यावर १५० कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
..........