रजनी पाटील यांना काँग्रेसची राज्यसभा उमेदवारी

महाराष्ट्र
 20 Sep 2021  223


राज्यपाल नामनियुक्त यादीत नव्या नावाचा समावेश होणार


लोकदूत वेबटीम 

मुंबई 20 सप्टेंबर 


येत्या ४ ऑक्टोबरला होऊ घातलेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातून बीडच्या रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी सोमवारी पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

रजनी पाटील यांचे राज्यसभेवर जाणे निश्चित झाल्याने त्यांचे नाव विधान परिषदेवरील राज्यपाल नामनियुक्त १२ सदस्यांच्या यादीतून आता वगळावे लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून नव्या नावाची शिफारस करावी लागेल.

काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या  एका जागेसाठी  पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करायची शेवटची मुदत उद्या, (२२ सप्टेंबर) संपत आहे. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा होती.

राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासह राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक, संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा होती. अखेर काँग्रेसने रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
----------------------------------
भाजपकडून उपाध्याय :
दरम्यान, भाजपने राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपाध्याय यांच्या नावाची घोषणा केली.  उपाध्याय २२ सप्टेंबरला सकाळी  ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील, असेही पाटील यांनी सांगितले.
------------------------------------------------
पोटनिवडणूक बिनविरोध?
राज्यसभेची महाराष्ट्रातली ही जागा विधानसभा आमदांरांतून निवडुन द्यायची आहे. या जागेसाठी खुले मतदान असल्याने मते फुटण्याची शक्यता नाही. परिणामी, पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची जास्त शक्यता आहे. राज्यातील महाविकास आघाडीकडे  पुरेसे संख्यबळ असल्याने भाजप आपला उमेदवार मागे घेण्याची शक्यता आहे.
------------
काँग्रेसकडून नवे नाव
आघाडी सरकारने गेल्या वर्षी विधान परिषदेवरील १२ राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची यादी राजभवनला सादर केली होती. या यादीत काँग्रेस कोट्यातून रजनी पाटील यांचा समावेश होता. आता त्यांची वर्णी राज्यसभेवर लागणार असल्याने काँग्रेसकडून राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून नवे नाव दिले जाईल.
------------------