चंद्रकांतदादांनाच नाही तर चार मंत्र्यांना भेटलो : तटकरे

महाराष्ट्र
 02 Aug 2019  365

लोकदूत वेबन्यूज टीम 
मुंबई दि 1ऑगस्ट

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजपात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असतानाच काल राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांनी मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या या भेटीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुनिल तटकरेच्या बाबत वेगवेगळ्या बातम्या प्रसारित झाल्याने रायगड लोकसभा मतदारसंघातील काही महत्वाच्या विकासकामासंदर्भात महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांनी फेसबुकच्या माध्यामातून केले आहे.

माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघातील काही महत्त्वाच्या विकासकामांसंदर्भात काल महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली. मात्र याबाबत वेगवेगळ्या बातम्या प्रसारित होत आहेत. मी काल केवळ चंद्रकांत पाटील यांनाच भेटलो नाही तर चार मंत्र्यांना भेटलो, त्यात शिवसेनेचे मंत्रीही होते, तसेच चार सचिवांनाही भेटलो.दापोली येथील कुणबी समाज संघाला जागा मिळवण्यासाठी चंद्रकांतदादा पाटील यांना भेटलो. गुहागर, दापोली, खेड, मंडणगड येथील हायब्रीड अॅन्यूटीमधील रस्त्यांबाबतही त्यांना भेटलो. पर्यटनमंत्री जयकुमार रावल, शिवसेनेचे राज्यमंत्री दादाजी भुसे, तसेच काही सचिवांनाही भेटलो.लोकसभा निवडणुकीत मी जी कामे करण्याचे आश्वासन दिले होते, त्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी मी या सगळ्यांना भेटलो. माझे विचार, माझी निष्ठा केवळ आदरणीय शरद पवार यांच्यासोबत आहे. अफवा पसरवून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या भेटींसंदर्भात उठणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेईल आणि त्यावेळी मी आणि माझ्या रायगड लोकसभा मतदारसंघ खा. शरद पवार यांच्यासोबत भक्कमपणे उभे असू असे खा. तटकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे.