आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्षपदी लागणार वर्णी

विधिमंडळ
 22 Dec 2021  397

विधानसभा अध्यक्ष निवड होणार हात उंचावून

-विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियमात केला बदल
-नियम बदलण्यावर सत्ताधारी आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

लोकदूत वेबटीम 

मुंबई 22 डिसेंबर 


विधानसभा अध्यक्ष निवड यापुढे हात उंचावून (आवाजी पद्धत) प्रत्यक्षपणे होणार आहे. तसा महाराष्ट्र विधानसभा नियम २२५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव बुधवारी विधानसभेत मंजूर झाला. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला असून चालु अधिवेशनात अध्यक्ष निवड होणार आहे.

काँग्रेस सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानसभा नियम समितीचा अहवाल सादर केला. त्यामध्ये नियम समितीच्या अहवालातील सुधारणा करण्याची नोटीस देण्यासंबंधातील दहा दिवसाचा कालावधी २४ तासावर आणण्यात येत असल्याचे सांगतिले. त्याला विरोधी सदस्यांनी आक्षेप घेतला.

राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी घोडेबाजार टळण्यासाठी आम्ही उघडपणे अध्यक्ष निवडीची पद्धत आणत असल्याचे सांगितले. तसेच माजी पंतप्रधान व भाजप नेतेे अटल बिहारी वाजपेयी यांनी वरिष्ठ सदनात सदर पद्धत रुढ केल्याचा दाखला दिला. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत वाजपेयी यांनी सत्ताधाऱ्यांचा स्वत:च्या सदस्यांना विश्वास नाही का, असा सवाल केला.

त्यावर काँग्रेसचे नाना पटोले उठले व भाजप सदस्यांना घोडेबाजार शब्द का डाचतो, असा सवाल केला. आमचा आक्षेप नियम बदलण्यास नाही, मात्र नियम बदलण्याची प्रक्रिया बेकायदेशीर करण्याला आहे, असा मुद्दा फडणवीस यांनी मांडला. तुमच्याकडे १७० चे संख्याबळ आहे, मग का घाबरता असे म्हणत गेली ६० वर्ष जो नियम आहे, तो का बदलता आहात, अशी विचारणा फडणवीस यांनी केली.

शेवटी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सदर प्रस्ताव हा नियम तपासून टाकला असून विरोधकांना काही हरकती असतील तर उद्यापर्यंत मुदत आहे, असे स्पष्ट करत मुद्दा निकाली काढला. शेवटी वैधानिक हक्क वगळत असल्याचे कारण देत भाजप सदस्यांनी सभात्याग केला.
-------