काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांची उमेदवारी दाखल

विधिमंडळ
 16 Nov 2021  436

* पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी काँग्रेसची अपेक्षा
* २६ नोव्हेंबर अर्ज माघारीचा दिवस, २९ नोव्हेंबरला मतदान

लोकदूत वेबटीम

 मुंबई 17 नोव्हेंबर 


विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव  यांनी मंगळवारी  अर्ज दाखल केला. शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर होत असलेली निवडणूक बिनविरोध व्हावी अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करु. असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले.

डॉ. प्रज्ञा  सातव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आणि सहप्रभारी आशीष दुआ, सोनल पटेल, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी, अमित झनक, राजेश राठोड, राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे आदी उपस्थित होते.

चंद्रकांत हंडोरे, मोहन जोशी आणि सचिन सावंत हे काँग्रेसकडून या जागेसाठी इच्छुक होते. मात्र सातव यांची वर्णी पक्षश्रेष्ठींनी लावली. प्रज्ञा सातव यांची ही पहिलीच निवडणूक आहे.  
..........