माक्स मुक्तीबाबत सरकारची चाचपणी

मुंबई
 27 Jan 2022  207

मास्कचा निर्णय टास्क फोर्सच्या चर्चेनंतर


-मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळ बैठकीत केले स्पष्ट
-राज्यातील जनतेची मास्कच्या वापरातून सुटका होण्याची शक्यता नाही

लोकदूत वेबटीम 

मुंबई 27 जानेवारी 


पाश्चिमात्य देशांमध्ये मुखपट्टी वापराचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत गुरुवारी मास्कचे निर्बंध शिथील करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या संदर्भात राज्य कोरोना कृती दलाशी चर्चा करण्यात येणार असून त्यानंतर मास्कबाबतचे धोरण जाहीर करण्यात येणार आहे.

जगातील अनेक देशांमध्ये मास्कचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. इंग्लंड,अमेरिका,न्यूझीलंड,हंगेरी या देशांचा त्यात समावेश आहे. ज्या देशांमध्ये वेगाने लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तिथली जनता मास्कच्या निर्बंधातून मुक्त झाली आहे. राज्यात देखील कोरोनाचे संक्रमण हळूहळू कमी होत आहे. तिसरी लाट ज्या वेगाने सुरू झाली ती तितक्याच वेगाने आता ओहोटीला लागल्याचे चित्र आहे.या पार्श्वभूमीवर राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत देखील मास्कच्या निर्बंधाबाबत चर्चा झाली.

आपल्या देशातही लसीकरण मोहीम मोठया वेगाने सुरू आहे.वेगाने लसीकरण पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.राज्यात आतापर्यंत १४ कोटी ६९ लाख ५७ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. यात ६ कोटी ३ लाख १२ हजार २४० नागरिकांनी दुसरा तर ८ कोटी ५९ लाख १७ हजार ३७ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे. लसीकरणाचा महत्वाचा टप्पा पार केल्यानंतर राज्यातील जनतेचीही मास्कच्या वापरातून सुटका करण्याची चर्चा सुरु आहे.

मंत्रीमंडळ बैठकीत कोरोना सादरीकरणादरम्यान मास्क वापराचे निर्बंध दूर करण्याचा विषय निघाला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, त्या देशातील निर्णय राजकीय आहेत. आपण मात्र याविषी शास्त्रीय चिकित्सा करुन निर्णय घेणार अाहोत. आपण काेरोना कृती दलाशी यावर चर्चा करु, त्यांचे मत जाणून आपण पुढे जाऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांचा आजाचा एकुण सुर पाहता राज्यातील मास्क वापराचे निर्बंध इतक्यात दुर होण्याची शक्यता नाही, असे एका ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितले.
--------------