सरकारची चालूगिरी - फडणवीस

विधिमंडळ
 07 Mar 2022  437
कृषीपंपाच्या मुद्यावर विरोधक आक्रमक
सरकार चालूगिरी करतोय विरोधकांचा आरोप


लोकदूत वेबटीम 

मुंबई 7 मार्च 

कृषी पंपाच्या थकीत वीजबिलामुळे सुरु असलेली कारवाई तात्काळ थांबवावी, या मागणीसाठी विरोधकांनी आज विधानसभेत आक्रमक पवित्रा धारण केला. थकबाकीसह चालू बिल दाखवून वसुली सुरू आहे. बिले भरली नाहीत तर कनेक्शन तोडली जातात, सरकार चालू वीज बिलात चालुगिरी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला. विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब देखील करण्यात आले.त्यानंतर या गोंधळातच इतर कामकाज आटोपते घेत नंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

  
शेतकऱ्यांच्या कृषी पंप आणि घरगुती वीज जोडणी कोणतीही पूर्वसूचना न देता कापत असल्याप्रकरणी आज विधानसभेतआमदार कुणाल पाटील, नाना पटोले यांच्यासह इतर आमदारांनी लक्ष्यवेधी मांडली होती. तर याच मुद्यावर काही आमदारांती तारांकित प्रश्न देखील उपस्थित करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि राज्यमंत्री प्राजक्त तणपुरे यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन करण्याचा आग्रह विरोधकांनी धरला. मात्र, विरोधकांची मागणी फेटाळून लावल्याने विरोधी पक्षातील आमदारांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु केली. 
 

यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मागील अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात राज्याची आर्थिक परिस्थिती समजून घेऊनच काही घोषणा केल्या होत्या. तीन महिन्यांचे चालू बिल भरल्यास कनेक्शन तोडणार नाही. थकबाकी असल्यास चालू बिल भरल्यानंतर कनेक्शन सुरू करू असे सांगितले होते. मात्र, हे सभागृह आश्वासनच पाळणार नाही का? शब्दांची फिरवाफिरवी करून दिशाभूल सुरू आहे का? चालू बिलाचे वेगळे अर्थ लावले जात आहेत. चालू बिल हे ११ महिन्यांचे दाखवले जात आहे. एकूण थकबाकीच्या वसुलीचा सपाटा लावला असून सरकार चालू बिलात चालूगिरी करत आहे.’ असा आरोप केला. तर कॉंग्रेसच्या नाना पटोले यांनीही वीज कनेक्शन तोडणे बंद करा, शेतकऱ्यांना रात्री १२ ते पहाटे सहा पर्यंत वीज पुरवठा केला जातो. त्याऐवजी दिवसा वीजपुरवठा करा, याची अंमलबजावणी कधी करता याचा खुलासा करण्याची मागणी केली.


सूरज जाधवच्या आत्महत्येचे पडसाद
सोलापूर जिल्ह्यातील सूरज जाधव या तरुणाने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेचे पडसाद ही आज विधानसभेत उमटले. गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, कनेक्शन तोडली त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. दुसरा अर्थसंकल्प आला तरीही काहीच होत नाही, असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला. या कुटुंबाला तातडकीने मदत मिळावी अशी मागणी केली.