पोलीसांवर गुन्हे दाखल करण्याची फडणवीसांची मागणी

मुंबई
 30 Dec 2021  218

राणेंना साक्षीसाठी बोलविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा


विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

लोकदूत वेबटीम 
मुंबई 30 डिसेंबर 


पोलिसांना ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलीस  ठाण्यात साक्षीसाठी बोलवता  येत नाही. अशा व्यक्तीची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते.  त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस देऊन पोलीस  ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर गुन्हा असून  अशी नोटीस देणाऱ्या  त्या पोलिस अधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहिता सी १६६ ए अंतर्गत एफआयआर नोंदवावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी  ट्विटद्वारे  केली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नितेश राणे गेल्या दोन दिवसांपासून गायब आहेत. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे कुठे आहेत हे आपण सांगणार नाही, असे विधान केले होते. त्यानंतर पोलीसांनी राणे यांना नोटीस बजावली होती. या पार्श्वभूमीवर फडणवीस  यांनी पोलिसांच्या कारवाईवर आज टीका केली.
सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते. सीआरपीसीनुसार १६०  ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक हे विसरले की ६५  वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात साक्षीसाठी बोलविता येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते. त्यामुळे आता त्या पोलिस अधिकाऱ्यांवर  एफआयआर नोंदविला जावा, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
पोलीस अधिकाऱ्यावर एफआयआर न नोंदविल्यास  भाजप सीआरपीसी  १५६ (३ ) अंतर्गत खटला दाखल करेल. तसेच हे जर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा  आयपीसी ३४  अन्वये सहआरोपी बनविण्याची मागणी भाजपा करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
...................