समीर वानखेडेच्या मेव्हूनिवर पुण्यात केस

मुंबई
 08 Nov 2021  201

समीर वानखेडेच्या मेव्हुणीवर पुण्यात ड्रग्जची केस 

* नवाब मलिक यांचा दावा

लोकदूत वेबटीम

मुंबई 8 नोव्हेंबर 

 

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे तुमची मेव्हणी ड्रग्जच्या व्यवसायात गुंतली आहे का याचे उत्तर तुम्ही द्यावे असे व्टिट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी केले आहे.

कार्डेलिया क्रूझवरील छापेमारीनंतर नवाब मलिक यांनी एनसीबी व  समीर वानखेडे यांच्यावर दररोज नवनवीन  आरोप करून खळबळ माजवली आहे. आता त्यांनी थेट समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर यांच्या बहिणीवर व्टिटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. तुमची मेव्हुणी हर्षदा दिनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतली आहे का याचे उत्तर समीर वानखेडे यांनी द्यावे असे व्टिट केले आहे. पुण्यातील कोर्टात त्यांची केस प्रलंबित आहे. हा घ्या पुरावा,  असे व्टिटमध्ये नमूद करीत त्यासोबत प्रलंबित केसचा नंबर व केसच्या अन्य तपशीलाचे स्क्रीन शाँट जोडले आहेत.

या व्टिटनंतर नवाब मलिक यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी माझे म्हणणे ट्वीटमध्ये स्पष्टपणे मांडले आहे. केस पुण्याच्या कोर्टामध्ये प्रलंबित आहे. हे खरं आहे का? आणि त्यांचा समीर वानखेडेंशी काय संबंध आहे? याचा खुलासा वानखेडेंनी केला पाहिजे.

समीर वानखेडेंचे स्पष्टीकरण

नवाब मलिक यांच्या व्टिटवर समीर वानखेडे यांनी तात्काळ प्रतिक्रीया देत हर्षदा रेडकर यांच्या विरुध्द असलेल्या प्रलंबित प्रकरणाशी माझा अजिबात संबंध नाही असे सांगितले. ही केस जानेवारी २००८ची आहे. या प्रकरणानंतर नऊ वर्षांनी म्हणजेच २०१७मध्ये क्रांती सोबत लग्न झाले. २००८मध्ये मी एनसीबीच्या सेवेतही नव्हतो. मग त्या प्रकरणाशी माझा कसा संबंध असू शकतो, यात माझे विनाकारण नाव गोवण्यात आल्याचे स्पष्टीकरण समीर वानखेडे यांनी केले आहे.