'त्या' ड्रग्ज पार्टीचे आमंत्रण,परंतु गेलो नाही - मंत्री अस्लम शेख

मुंबई
 08 Nov 2021  198

 

-मत्सव्यवसाय, वस्त्रोद्योग मंत्री अस्‍लम शेख यांचा खुलासा

लोकदूत वेबटीम

 मुंबई 8 नोव्हेंबर

दिवसातून ५० जण मला विविध कार्यक्रमांसाठी निमंत्रणे देत असतात. त्याचप्रमाणे काशिफ खान याने कार्डीलिया क्रूझ पार्टीसाठी निमंत्रण दिले होते. पण मी पार्टीला गेलो नाही. त्‍या पार्टीविषयी मला काही माहिती नाही, असा खुलासा मुंबई शहरचे पालकमंत्री,  मत्सव्यवसाय, वस्त्रोद्योग मंत्री व काँग्रेस नेते अस्‍लम शेख यांनी सोमवारी केला.


क्रुझ पार्टीची मोठया प्रमाणावर चर्चा झाली. पण गुजरातमध्ये २१ हजार कोटींचे ड्रग्‍ज पकडले. त्याची माहिती उघडकीस का येत नाही. त्‍यावर माध्यमांसह कोणीच काही बोलत कसे नाही, असा सवाल अस्‍लम शेख यांनी केला.


क्रूझ पार्टी प्रकरणाची पाळेमुळे रोज विस्‍तारतच चालली आहेत. अल्‍पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या पार्टीसाठी मंत्री अस्‍लम शेख यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. यामागे आघाडी सरकारला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र होते, असा आरोप केला होता. त्‍यावर अस्‍लम शेख यांनी पत्रकारपरिषद घेऊन स्‍पष्‍टीकरण दिले.


शेख म्हणाले, पार्टीचा आयोजक काशिफ खान याने आपल्‍याला पार्टीला बोलावले होते. मात्र काशिफ खान यास आपण ओळखत नाही. तो कुठल्‍यातरी कार्यक्रमात मला भेटला होता. दिवसातून असे पन्नास लोक मला विविध कार्यक्रमांसाठी आमंत्रण देत असतात. पण या पार्टीला मी गेलो नाही. त्‍या पार्टीच्या माध्यमातून कोणी षडयंत्र रचले होते का, याचा तपास यंत्रणा घेतील.


क्रूझला परवानगी देण्याचे काम आमच्या विभागाचे नाही. आमच्या विभागाने क्रूझला परवानगी दिली नव्हती. सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकरणातही मुंबईच्या पालकमंत्रयाचे नाव घेतले गेले. भाजपा नेत्‍यांनीही अप्रत्‍यक्षपणे ते नाव चालविण्याचा प्रयत्‍न केला. मात्र केवळ बिहार निवडणूक पार पडेपर्यंत हे प्रकरण चालले. बिहारची निवडणूक संपली आणि सुशांतसिंग प्रकरणही संपले. असेही शेख म्‍हणाले.