अनिल देशमुख यांना ईडी ची कोठडी

मुंबई
 07 Nov 2021  216

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडी कोठडी

-सत्र न्यायालयाचा निर्णय फिरवत उच्च न्यायालयाने सुनावली कोठडी

लोकदूत वेबटीम 

मुंबई 7 नोव्हेंबर 


 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आडचणीत वाढ झाली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या अनिल देशमुखांची रवानगी न्यायलयीत कोठडीत करण्यात आली होती. मात्र, आता उच्च न्यायालयाने शनिवारी सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत अनिल देशमुखांची रवानगी १४ दिवसांच्या ईडी कोठडीत केली आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सीबीआयने एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीनेही गुन्हा नोंदवून देशमुख यांना समन्स बजावले होते. त्याविरोधात त्यांनी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर  व ७ समन्स मिळाल्यावर ते १ नोव्हेंबर रोजी ईडीसमोर हजर झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी १२ तासांच्या चौकशीअंती देशमुख यांना मध्यरात्रीनंतर अटक केली.

२ नोव्हेंबर रोजी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली होती. या कोठडीची मुदत संपत असल्याने शनिवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी देशमुख यांची आणखी चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगून ईडी कोठडी नऊ दिवसांनी वाढवण्याची विनंती ईडीतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी न्यायालयाला केली होती.

न्यायालयाने ईडीची विनंती फेटाळत देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सत्र न्यायालयाने विनंती फेटाळल्यानंतर ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत अनिल देशमुखांची रवानगी १४ दिवसांच्या ईडी कोठडीत केली आहे. आता १२ नोव्हेंबरपर्यंत आता अनिल देशमुखांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी तत्कालीन पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्यामार्फत बार अँड रेस्टॉरंट मालकांकडून कोट्यवधी रुपयांची माया जमवली आणि चार कोटी ७० लाख रुपये केवळ नावापुरत्या असलेल्या अनेक कंपन्यांमार्फत देणग्यांच्या माध्यमातून आपल्या शिक्षणसंस्थेत वळवले, असा आरोप ईडीने ठेवला आहे.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप आहेत. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली.
-------------------------------------