मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

मुंबई
 07 Nov 2021  207

क्रुझवरील छाप्याचा सुनिल पाटील मास्टर माईंड

-सुनिल पाटील हा राष्ट्रवादीचा धुळ्याचा कार्यकर्ता
-नवाब मलिकांची तीन हजार कोटींची बेनामी संपत्ती
 

लोकदूत वेबटीम 

 मुंबई 7 नोव्हेंबर 


भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी शनिवारी खळबळजनक गौप्यस्फोट केला. किरण गोसावी हाच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुनील पाटील यांचा पंटर आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंडच सुनील पाटील आहे, असा दावा कंबोज यांनी केला आहे. त्यामुळे ड्रग्ज प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

मोहित कंबोज यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणाची वेगळी बाजू मांडून खळबळ उडवून दिली. माझ्या माणसाची एनसीबीच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून द्या असे पाटीलने सॅम डिसूजाला सांगितले होते. पाटील यांचा हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून किरण गोसावी होता. पाटीलने सॅमला गोसावीचा नंबरही पाठवला आणि किरण गोसावीच सर्व कारवाई करणार असल्याचे सांगितले, असा गौप्यस्फोट कंबोज यांनी केला.

आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड सुनील पाटील आहेत. सुनील पाटील हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून ते धुळ्याचे आहेत. गेल्या 20 वर्षापासून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध आहे. केवळ संबंधच राहिले नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांचे ते जिगरी दोस्त आहेत. आर आर पाटील यांचे निकटवर्तीय होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी सुनील पाटील यांचे घरगुती संबंध आहेत, असा दावा कंबोज यांनी केला.

सुनील पाटील बदल्यांचं रॅकेट चालवत होते. दिल्लीत बसून ते हे रॅकेट चालवत असतात. तेच पैसा घेऊन संबंधित मंत्र्यांना द्यायचे. त्यांचे राज्यभरात बदल्यांचे रॅकेट होते. सरकार बदलल्यानंतर ते भूमिगत झाले. सरकार आल्यानंतर पुन्हा सक्रिय झाले. मोठमोठ्या हॉटेलमध्ये त्यांच्या पार्ट्या चालतात, असा दावा कंबोज यांनी केला.

सुनील पाटीलने 1 तारखेला सॅम डिसोजाला व्हॉट्सअॅप केले होते. चॅट नंतर व्हॉट्सअॅप कॉल केला होता. माझ्याकडे 27 लोकांची लीड असून मुंबईत क्रुझ पार्टी होणार आहे. त्यात ड्रग्जचे सेवन होणार आहे. माझी एनसीबीच्या एखाद्या अधिकाऱ्याशी चर्चा करून द्या, असे पाटीलने सॅमला सांगितले होतं. त्यानंतर सॅमने एनसीबीच्या व्ही.व्ही. सिंग या अधिकाऱ्याशी बोलणे करून दिले, असा दावाही कंबोज यांनी केला.
-----------------------------------------
नवाब मलिक यांच्याकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती आहे. त्यांच्या एकूण 22 मालमत्ता आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब फॅमिली ट्रस्टच्या नावाने जोडले गेले आहेत. भंगारवाला करोडपती कसा झाला हे राज्यातील जनतेला कळायला हवे, असे कंबोज पत्रकार परिषदेत म्हणाले.
---------------------------------------------------