मंत्री नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

मुंबई
 07 Nov 2021  191

खंडणी उकळण्यासाठी 'आर्यन'च्या अटकेचा खेळ

-खेळातील सूत्रधार भाजपा नेता माेहीत कंबोज

लोकदूत वेबटीम 
 मुंबई 7 नोव्हेंबर 


कॉर्डिलिया क्रुझवरील छापा प्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू असताना रविवारी  राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी नवा गौप्यस्फोट केला. अभिनेता शाहरुख खान याचा पुत्र आर्यन याची अटक खंडणी उकळण्यासाठी होती, असा दावा मलिक यांनी केला. तसेच या नाट्याचा सूत्रधार भाजप युवा मोर्चाचा नेता मोहीत कंबोज (मुंबई) असल्याचे ते म्हणाले.

मलिक म्हणाले की, आर्यन खानला २ ऑक्टोबरच्या दिवशी क्रूजवर बोलावण्यात आले होते. प्रतीक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यन खान क्रूजवर गेला. मोहीत कंबोज यांच्या साल्याच्या माध्यमातून हे जाळे टाकण्यात आले. आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटींची खंडणी मागण्यात आली. डील १८ कोटींमध्ये झाली. ५० लाख रुपये उचलले गेले. पण के. पी. गोसावीच्या सेल्फीने खेळ बिघडवला”.

मोहीत कंबोज आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे मित्र आहेत. खंडणीच्या खेळात मोहीत कंबोज वानखेडेचे सहकारी आहेत. ७ तारखेला कंबोज आणि वानखेडे ओशिवरा स्मशानभूमी बाहेर भेटले. मात्र स्मशानभूमीच्या जवळचे सीसीटीव्ही फूटेज कॅमेरा बंद होता, म्हणून मिळू शकले नाही, असे मलिक यांनी सांगितले.

वानखेडेच्या प्रायव्हेट आर्मीचे कंबोज एक खेळाडू आहेत. ड्रग्ज माफियांना संरक्षण देणे, ड्रग्ज घेणाऱ्यांना अडकवून त्यांच्याकडून खंडणी घेणे, हा समीर वानखेडे खेळ खेळत आहेत” असा आरोप मलिक यांनी केला.

मोहीत कंबोज हा बँकेच्या फ्रॉडमध्ये आहे. कंबोजने 1100 कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे. दिंडोशीतून निवडणूक लढवली. पराभूत झाल्याने त्याला भाजप युवा मोर्चाचे पद दिले. घोटाळ्याप्रकरणी त्याच्या घरावर सीबीआयची धाड पडली. पण भाजपमध्ये गेल्यानंतर सर्व बंद झाले, असा दावा मलिक यांनी केला.
--------------------
कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीत सेलिब्रिटी आणि मंत्र्यांच्या मुलांना अडकवण्याचा कट फॅशन टीव्हीचा संयोजक काशिफ खान याने आखला होता. या पार्टीसाठी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनाही गळ घालण्यात आली होती. मात्र, शेख पार्टीला गेले नाहीत, असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला.
------
के. पी. गोसावी हा धुळे येथील राष्ट्रवादीचा नेता सुनील पाटीलचा पंटर आहे, असा आरोप मोहीत कंबोज यांनी केला आहे. त्यावर पाटील याचा राष्ट्रवादीशी काही संबंध नाही. सुनील पाटीलही फ्रॉड आहे. तेही वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीचा प्लेअर आहे, असा खुलासा मलिक यांनी केला.
----