रविवारी नवाब मलिक करणार नवा गौप्यस्फोट

मुंबई
 03 Nov 2021  213

 लोकदूत वेबटीम

मुंबई 3 नोव्हेंबर 


अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे, आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लक्ष्मीपूजनच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्र्रेसचे नेते नवाब मलिक यांनी राजकीय शस्त्रसंधी केली. तथापि, हॉटेल द ललितमध्ये अनेक गुपित रहस्ये दडलेली असून, रविवारी भेटुया असे ट्वीट मलिक यांनी बुधवारी  केले. त्यामुळे दिवाळीनंतर मलिक कोणता गौप्यस्फोट करतात याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवरील ड्रग पार्टीचे प्रकरण गेल्या चार आठवड्यापासून गाजत आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नवाब मलिक सातत्याने आरोप करीत आहे. काल मंगळवारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर दिवाळसणात थोडीशी विश्रांतीचा पॉज घेऊन नवाब मलिक यांनी ललित हॉटेलमध्ये दडलेली रहस्ये बाहेर काढण्याचा इशारा दिला आहे. याआधी वरळीच्या एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या कथित ड्रग पार्टीच्या उद्योगाविषयी मलिक यांनी भाष्य केले होते.

आज बुधवारी नवाब मलिक यांनी ट्वीट केले आहे. बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेंगी, लोग बेवजह उदासी का सबब पुछेंगे असे मलिक यांनी म्हटले आहे. त्यानंतर पुन्हा मलिक यांनी ट्वीट केले आहे. शुभ दिपावली. आप सभीको दिवाली मंगलमय हो. हॉटेल द ललित मे छुपे है कई राज…मिलते है रविवार को…या ट्वीटमुळे येत्या रविवारी नवाब मलिक काय बोलणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, समीर वानखेडे लक्षावधी रुपयांचे कपडे घालतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कपड्यांपेक्षा समीर वानखेडे यांच्या कपड्यांची किंमत जास्त आहे. समीर वानखेडे यांनी केलेल्या वसुलीची सखोल चौकशी केली पाहिजे, या मागणीवर ठाम आहे. अंमली पदार्थांचा खुलेआम खेळ राजकीय आश्रयाशिवाय चालूच शकत नाही. यात बडी राजकीय धेंडे अडकली असल्याचा मलिक यांचा आरोप आहे.
---