आयकर विभागाच्या कारवाईवर मलिकांचा आरोप

मुंबई
 02 Nov 2021  198

अजित पवार यांचे नाव गोवण्याचे कारस्थान

* आयकर विभागाच्या कारवाईवर  नवाब मलिक यांचा आरोप

लोकदूत वेबटीम 
मुंबई 2 नोव्हेंबर 

कोणतीही संपत्ती ही बेनामी नसते. त्याचा कुणीतरी मालक असतोच. त्यामुळे दुसऱ्या कुणाच्या तरी संपत्तीवर टाच आणून त्याला  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देणे योग्य नाही. दुसऱ्याच्या संपत्तीत अजित पवार यांचे नाव गोवण्याचे हे कारस्थान आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी  केली.

आज आयकर खात्याने टाकलेल्या धाडीत अजित पवार यांच्याशी संबंधित संपत्ती जप्त करण्यात आल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना मलिक यांनी चौकशी यंत्रणा आणि भाजपवर टीका केली.  पवार यांची संपत्ती जप्त केल्याच्या दाव्यात तथ्य नाही.भाजपच्या नेत्यांची त्यांच्या नोकरांच्या, केंद्रीय मंत्र्यांच्या किचन कूकच्या नावे संपत्ती असल्याचेही समोर येऊ शकते. पण अशा प्रकरणातून केवळ बदनामी केली जाते, हे मलिक यांनी लक्षात आणून दिले.


महाविकास आघाडी सरकार आपली जबाबदारी पार पाडत असताना केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करुन राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या प्रयत्नाला राज्य सरकार किंवा त्यातील एकही व्यक्ती न घाबरता लढा देणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

छगन भुजबळ यांच्याबाबतीतही असेच झाले होते. महाराष्ट्र सदनात घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना न्यायालयाने भुजबळांना निर्दोषत्व बहाल केले. केवळ घाबरवण्याचे आणि धमकावण्याचा खेळ सुरु आहे यातून आम्ही घाबरुन जाणार नाही, असेही मलिक यांनी बजावले.

जो खेळ बंगालमध्ये सुरु होता, तोच खेळ आता महाराष्ट्रात केला जात आहे. निवडणुकीच्या आधीही हा बदनामीचा खेळ सुरु होता. भाजपने नेत्यांवर दबाव टाकून पक्ष सोडण्यावर भाग पाडले. अनेक लोक भाजपमध्ये तेव्हा गेले, ते आता सांगतात की, आम्हाला शांत झोप लागते. यावरुनच संस्थांचा वापर करुन दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते, असेही मलिक म्हणाले.
.............