मुंद्रा बंदरावरील ड्रग्ज प्रकरणावरून मलिकांचे वानखेडेंवर आरोप

मुंबई
 02 Nov 2021  202

मुंद्रा बंदरात आयात ड्रग्जची चौकशी करा

वानखेडे यांनी केली हजारो कोटींची वसुली
मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

लोकदूत वेबटीम 

मुंबई 2 नोव्हेंबर 

गुजरातमधील मुंद्रा, उरणच्या जेएनपीटी पोर्टवर हजारो कोटींचे अंमली पदार्थ मिळाल्यानंतर एनडीपीएस कायद्याखाली कारवाई का होत नाही? समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली केल्याचा गंभीर आरोप करुन या प्रकरणाची सखोल चौकशी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येतील. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी सांगितले.

मलिक म्हणाले, समीर वानखेडे एनसीबीत आल्यापासून स्वतःची प्रायव्हेट आर्मी उभी करुन कोट्यवधींची वसुली सुरु केल्याचा आरोपाचा पुनरुच्चार त्यांनी केला. माझ्या जावयाच्या घरी गांजा सापडल्याचा फडणवीस यांचा आरोप बिनबुडाचा आहे. त्या पंचनाम्यात गांजा सापडला नसल्याचे नमूद आहे. न्यायालयानेही गांजा सापडला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या आरोपावर फडणवीस माफी मागणार आहेत काय का? असा सवाल मलिक यांनी केला.  

मी गेल्या ६२ वर्षांपासून मुंबईत राहतो. माझे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे कोणीही म्हणू शकत नाही. माझे अंडरवर्ल्डशी संबंध असते तर पाच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होते. गृह मंत्रालय तुमच्याकडे होते. मग तुम्ही पाच वर्ष शांत का बसला होता. माझ्यावर कारवाई का केली नाही, असे मलिक यांचे म्हणणे आहे.

गेल्या २६ दिवसात मी कोणाची आई, बहीण, पत्नीचा उल्लेख केला नाही. दोन महिलांचा उल्लेख केला कारण त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध होता. जे लोक महिलांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यांना माझा सवाल आहे. दुसऱ्याच्या आई बहिणी या महिला नाहीत का? सोमय्या हे अजित पवार यांच्या आई-बहिणीविषयी बोलतात. संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांच्या पत्नीविषयी भाष्य करतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीविषयी सोमय्या बोलतात. भाजपने राजकारणाची पातळी खाली आणल्याचा मलिक यांचा आरोप आहे.

जनतेच्या प्रश्नावर एकदा नव्हे तर शंभर वेळा राजीनामा द्यायला तयार आहे, असे मलिक म्हणाले. कोर्टाच्या आदेशाच्या अवमानप्रकरणी त्यावेळी राजीनामा दिला होता. मी २००८ साली पुन्हा मंत्री झालो. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदास वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी नकली देवेंद्र शहरात फिरत असल्याचा त्यावेळी सवाल केला होता. तुमचा भाऊ शहरात काय करीत होता याची माहिती दिली होती. आम्ही त्यावेळी सीसीटीव्ही दिले असते तर तोंड दाखवायला जागा राहायला नसती. पण ते फूटेज आम्ही दाखवले नाही. दाखवणार नाही, असेही मलिक म्हणाले.

मुंबईत आल्यानंतर १५ ऑगस्ट २०२० रोजी समीर वानखेडे यांनी एक गुन्हा नोंद केला. अभिनेत्री सारा अली खान, श्रद्धा कपूर, दिपिका पदुकोण यांना चौकशीला बोलवण्यात आले होते. १४ महिन्यापासून आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. या प्रकरणाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये वसूल करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. एनसीबीचे अधिकारी माध्यमांसमोर येतात त्यांचे शर्ट ५०० रुपये किमतीचे आहेत. समीर वानखेडे यांचा शर्ट ७० हजार रुपयांचा असतो. समीर वानखेडे नरेंद्र मोदींच्या पुढचे निघाले. समीर वानखेडे यांनी हजारो कोटी रुपयांची वसुली केली असल्याचा आरोपही मलिक यांनी केला.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. कोणतीही संपत्ती ही बेनामी नसते. त्याचा कुणीतरी मालक असतोच. त्यामुळे दुसऱ्या कुणाचीतरी संपत्तीवर टाच आणून त्याला अजित पवार यांचे नाव देणे योग्य नसल्याचे मलिक म्हणाले. केवळ घाबरवणे, धमकावण्याचा खेळ सुरु आहे यातून आम्ही घाबरुन जाणार नाही, असा दावाही मलिक यांनी केला.