मंत्री नवाब मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

मुंबई
 01 Nov 2021  192

 

* मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबध असल्याच फडणवीस यांचा आरोप

लोकदूत वेबटीम 

 मुंबई 1 नोव्हेंबर 

राज्याचे  मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी नवीन जावई शोध लावला आहे.  राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ड्रग्ज उद्योगांचे मास्टर माइंड असल्याचा हास्यास्पद आरोप करीत  जयदीप राणा आणि नीरज गुंडेसोबत त्यांचे काय संबंध होते, यासंदर्भात न्यायिक चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

राज्यात गेले काही दिवस मंत्री नवाब मलिक आणि एनसीबी संचालक समीर वानखेडे यांचा जोरदार सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू होता, असा दावा ना. मलिक यांनी केला.

फडणवीस हेच मुख्यमंत्री या नात्याने मुंबईतील ड्रग्ज रॅकेटला संरक्षण देत होते. केंद्र सरकारने एक चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा तपास करावा. लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी, यासाठी फडणवीस यांनी शासकीय यंत्रणेचा सर्रास वापर केला,” असा दावा मलिक यांनी केला.

निरज गुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करतात. गुंडेच्या माध्यमातूनच फडणवीस यांचे मायाजाल चालायचे. फडणवीस सरकारच्या काळात नीरज गुंडे हे देवेंद्र यांचा दूत म्हणून उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचे, असा दावा मलिक यांनी केला.

मलिक म्हणाले, फडणवीस यांचा वजीर याच शहरात राहतो. त्याचे नाव निरीज गुंडे आहे. फडणवीस सरकारच्या काळात त्याला मुख्यमंत्री निवास, मुख्यमंत्री कार्यालयात थेट प्रवेश होता. सर्व पोलिसांच्या बदल्या तो ठरवत होता. महाराष्ट्रात त्याच्याच माध्यमातून वसुली केली जायची,” असा आरोप मलिक यांनी केला.

ड्रग्जचा खेळ मुंबई आणि गोव्यात सुरू राहावा म्हणून वानखेडे यांना मुंबईत आणण्यात आले. त्यामागे फडणवीस आहेत. महाराष्ट्रातील सर्व ड्रग्जचा खेळ फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालतो,” असा आरोप मलिक यांनी केला.

फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी नदी पुनरुज्जीवनाचा संदेश देण्यासाठी गायलेल्या एका गाण्याला जयदीप राणा याने अर्थपुरवठा केला होता. हा राणा ड्रग विक्रेता (पेडलर) आहे, असा आरोप मालिक यांनी केला.

एकुण, ऐन दिवाळीत ड्रग्ज रॅकेट प्रकरणी राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोपांची माेठी राळ उडाली आहे.

-----------------------------------

 

मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध : दवेंद्र फडणवीस

रिव्हर मार्चच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर आम्ही त्या मोहिमेशी जोडले गेलो होतो. त्या गाण्याच्या शूटिंगच्या वेळी हे फोटो काढण्यात आले आहेत.

 

मलिक यांचे जावई ड्रग्जसोबत सापडले आहेत. मलिकांच्या म्हणण्यानुसार अख्खी एनसीबी ड्रग्ज माफिया व्हायला पाहिजे. संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत फोटो आल्याने जर कोणी माफिया होत असेल तर ज्यांच्या घरी ड्रग्ज सापडते त्यांचा काय?

ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डसोबत आहेत अशा लोकांनी माझ्यासोबत बोलू नये. यासंदर्भातील पुरावे शरद पवार यांच्याकडे यांना पाठवणार आहे. मलिकांनी सुरुवात केली आहे, त्याला आता शेवटापर्यंत न्यावे लागेल.

------------

चोराच्या उलट्या बोंबा: अमृता फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी ट्विटच्या माध्यमातून मलिक यांच्या अारोपांवर भाष्य केले. चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते !, असे अमृता यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

-------------------

चौकशी व्हावी : संजय राऊत

असे काही असेल तर एनसीबीने चौकशी करावी. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी ते सादर करावेत. पण, महाराष्ट्रात अशी चिखलफेक होऊ नये. मलिकांच्या कुटुंबावर खोटा खटला दाखल करण्यात आला होता. आम्ही सगळे मलिकांच्या सोबत आहोत.