.......अन्यथा राजकारण सोडेन - मंत्री नवाब मलिक

मुंबई
 27 Oct 2021  220

 

- समीर वानखेडे प्रकरणी नवाब मलिक यांनी दिले आव्हान
-क्रुझवरच्या पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफीया असल्याचा दावा

लोकदूत वेबटीम 

मुंबई 27 ऑक्टोबर 


राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंविरोधात बुधवारी (ता.२७) आरोपांची पुन्हा राळ उडवून दिली. मी वानखेडे प्रकरणी केलेले आरोप जर खोटे असतील तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, अशी रोखठोक भूमिका मलिक यांनी जाहीर केली आहे.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा आज समाज माध्यमावर प्रसिद्ध केला. मी आतापर्यंत समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांवर ठाम आहे. वानखेडेंचा जन्माचा दाखला खोटा ठरल्यास मंत्रिपद सोडायला तयार आहे. मी केलेले आरोप खोटे ठरवून दाखवा, असे आव्हानच मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांना दिले आहे.

ते पुढे म्हणाले, समीर दाऊद वानखेडे यांचा जो मुद्दा समोर आणत आहे, तो त्याच्या धर्माचा नाही. ज्या फसव्या मार्गाने त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आणि त्यामुळे एका पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या भविष्यापासून वंचित ठेवले आहे, ते मला समोर आणायचे आहे.

तसेच समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचे छायाचित्र मलिक यांनी समाज माध्यमावर टाकले. डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत समीर वानखेडे यांनी निकाह (२००६) केल्याचे ते छायाचित्र आहे. समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊदच आहे आणि ते मुस्लिमच आहेत, असा दावा मलिक यांनी केला.

क्रुझवरील पार्टी फॅशन टीव्हीने आयोजित केली होती. राज्य सरकारची परवानगी न घेता कोविड नियमांचे पालन न करता शिपींग डायरेक्टरची परवानगी घेऊन ती पार्टी करण्यात आली होती, असा आरोप मलिक यांनी केला.
-------------
क्रुझवरील त्या कथीत ड्रग्ज पार्टीत एक आंतरराष्ट्रीय माफीया सहभागी होता. त्याच्यासोबत गर्लफ्रेंड हाती, ती हातात रिव्हाॅल्वर घेऊन होती. त्या रेव्ह पार्टीत एक दाढीवाला नाचत आहे, तो कोण आहे, तो कुठे गेला, त्याला का अटक नाही, याची उत्तरे एनसीबीने द्यावीत, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.
-----------------