मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खा.शरद पवार यांची बंद दाराआड बैठक

मुंबई
 20 Oct 2021  214

 

लोकदूत वेबटीम 

मुंबई २० ऑक्टोबर 

मुख्यमंत्री उदधव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे.मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली.राज्यातील राजकीय स्थिती,केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना करण्यात येणारे लक्ष्य तसेच आगामी काळात होणा-या महापालिका निवडणूका या विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.भाजपाकडून होणा-या हल्ल्यांना तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्याचा निर्णयही महाविकास आघाडीने घेतल्याचे समजते.

महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्री,नेते यांच्या विरोधात सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरू आहे.येत्या काही महिन्यांत मुंबईसह राज्यातील अनेक महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुका देखील पार पडणार आहेत.भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.आता आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रितपणे या हल्लयांना प्रत्युत्तर देणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.या मुददयांवर दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपा नेते किरिट सोमैया हे रोज महाविकास आघाडीतील एका नेत्याला लक्ष्य करून आरोपांची राळ उडवून देत आहेत.केंद्रीय तपास यंत्रणांनी देखील आघाडीतील नेत्यांना लक्ष्य केले आहे.तपास यंत्रणा या भाजपाच्या इशा-यावर चालत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे.आता एकेकटयाने त्यांना प्रत्युत्तर देण्यापेक्षा सगळयांनी मिळून प्रत्युत्तर दिले पाहिजे अशी भूमिका शिवसेना नेते खा.संजय राउत यांनी व्यक्त केली आहे.