भाजपचे 15 ते 20 नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात - शिवसेना

मुंबई
 18 Oct 2021  197

 डिसेंबरमध्ये शिवसेना करणार धमाका
- मुबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा दावा

लोकदूत वेबटीम

 मुंबई 18 ऑक्टोबर


भाजपमधील पालिकेतील वरिष्ठ नेत्यांच्या  मनमानीला कंटाळलेले १५ ते २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असून डिसेंबरमध्ये धमाका होईल, असा खळबळजनक दावा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सोमवारी  केला. भाजपने स्वप्नातून बाहेर पडावे अशी खोचक टीकाही जाधव यांनी केली.

मुंबई महापालिका निवडणूक चार महिन्यांवर आली असल्याने पालिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. स्थायी समिती यशवंत जाधव यांनी भाजपमधीव वरिष्ठ नेत्यांच्या मनमानीला कंटाळले १५ ते २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असा दावा आज पत्रकार परिषदेत केला. हे नगरसेवक कोण याबाबत डिसेंबरलाच समजेल असेही ते म्हणाले.

 भाजपमधील नेतृत्व या नगरसेवकांना जुमानत नसल्याने ते कंटाळले आहेत. त्यामुळे येत्या डिसेंबरमध्ये भाजपला खिंडार पडेल असेही जाधव म्हणाले. अन्याय झालेल्यांना शिवसेना नेहमीच आधार देत आली आहे. भाजपचे नगरसेवक आले तर त्यांना न्याय दिला जाईल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.

पालिकेत सध्या भाजप विरोधी पक्षही नाही व विरोधी नेतेपदही त्यांच्याकडे नाही. हे पद काँग्रेसकडे आहे. त्यामुळे भाजपने स्वप्नातून बाहेर पडावे, असा सल्लाही जाधव यांनी दिला. सध्या भाजपकडून शिवसेनेवर घोटाळ्याचे बेछुट आरोप केले जात आहेत. मात्र हे आरोप बिनबुडाचे आहेत. पालिका निवडणूक जवळ आल्य़ाने त्यांचे नगरसेवक फुटतील या धसक्याने भाजप लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे जाधाव म्हणाले.

 सध्या पालिकेत संख्याबळानुसार भाजप दोन नंबरचा पक्ष आहे. सन २०१७ च्या पालिका निवडणुकीत भाजपचे ८४ तर शिवसेनेचे ८६ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे भाजप हा दोन  नंबरचा पक्ष असून त्यावेळी विरोधीपक्षनेतेपदी न राहता भाजपने पहारेक-य़ाची भूमिका बजावली. त्यामुळे हे पद तीन नंबरवर असलेल्या काँग्रेसकडे गेले.

विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसने सोडल्याशिवाय भाजपला मिळू शकणार नाही, हे न्यायालयानेही सिध्द केले आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना - भाजपमधील आरोप- प्रत्यारोप सुरु झाले असून दिवाळीनंतर राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याचे दिसते.
.....
शिवसेनेचा फुसका बार
भाजपाचे नगरसेवक फुटणार हा शिवसेनेचा फुसका बार आहे. सेना उपऱ्यांच्या जोरावर चालत आहे. महापालिकेतही सेनेला सक्षम उमेदवार सापडत नसल्यामुळे भाजप नगरसेवक फोडण्याची भाषा करत आहे. भाजपाचा एकही नगरसेवक हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे ढुंकूनही पहाणार नाही, असा दावा भाजपचे प्रवक्ते भालचद्र शिरसाट यांनी केला.